Tuesday 16 November 2021

मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणावणार नाही

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 21 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे राहण्याची, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. सुरुवातीस 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादूर्भाव जास्त असल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% (संयूक्त किटकनाशक) 400 मिली प्रति एकर आलटून पालटून फवारणी करावी. पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. सध्या ढगाळ वातावरणामूळे तूरीवर किडींचा प्रादूर्भाव तसेच फुलगळ होण्याची शक्यता आहे. तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 एसजी 4.4 ग्राम किंवा फल्यूबँडामाइड 39.35 एससी 2 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 2 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.रब्बी सूर्यफूल पिकात आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.करडई पिकात आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.आंबा फळबागेत चांगला मोहोर लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये. द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला (वांगी, टोमॅटो, कांदा, फुलकोबी, पत्ताकोबी) पिकात तण नियंत्रण करून आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

फुलशेती

तोडणीस तयार असलेल्या फुलपिकांची तोडणी करून घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.

सामुदायिक विज्ञान

मानवी जीवनातील सुरूवातीच्या आठ वर्षाच्या काळात बालकांचा विकास अत्यंत झपाटयाने होत असतो. तेव्हा या काळात बालकांच्या सर्वांगीण विकासाला पूरक, चालना देणारे वातावरण पुरवणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक66 / 2021 - 2022     मंगळवार, दिनांक – 16.11.2021

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...