Friday, 3 June 2022

दिनांक 06 व 07 जून रोजी बीड, परभणी, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 06 व 07 जून रोजी बीड, परभणी, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून  तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग मागील आठवडयाच्या तूलनेत कमी झालेला आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 08 ते 14 जून, 2022 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पेरणीसाठी अति लवकर येणारे वाण: परभणी सोना (एमएयुएस-47), लवकर येणारे वाण: एमएयूएस-71 (समृध्दी), एमएयुएस-158, एमएयुएस-612, जवाहर (जेएस-335), शक्ती (एमएयुएस-81), मध्यम उशिरा येणारे वाण: प्रसाद (एमएयुएस-1), प्रतिकार (एमएयूएस-61), एमएयुएस-162, प्रतिष्ठा (एमएयूएस 61-2) इत्यादी वाणांचा वापर करावा. खरीप ज्वारी पेरणीसाठी संकरीत वाण: सीएसएच-14, सीएसएच-16, सीएसएच-25 (परभणी साईनाथ), सुधारीत वाण: परभणी शक्ती, पीव्हीके-809, पीव्हीके-801 (परभणी श्वेता) इत्यादी वाणांचा वापर करावा. बाजरीच्या पेरणीसाठी संकरीत वाण: सबुरी, श्रध्दा, शांती, एएचबी-1269, सुधारीत वाण: आयसीटीपी, समृध्दी, परभणी संपदा या वाणांचा वापर करावा. ऊस पिकात आंतरमशागतीची कामे करून तणांचे नियंत्रण करावे. हळद लागवडीसाठी सेलम, कृष्णा, राजापूरी, फुले स्वरुप या सुधारीत जातींची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा, किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी जातींची निवड करावी. जून्या बागेत आंतरमशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. जून्या बागेत आंतरमशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी.  चिकू नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी. जून्या बागेत आंतरमशागतीची कामे पूर्ण करून घ्यावी.

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. मिरची पिकाच्या लागवडीसाठी परभणी तेजस, पूसा ज्वाला, अग्नीरेखा, फुले ज्योती, जी-4, जी-3 इत्यादी जातींची निवड करावी. टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी देवगिरी, परभणी यशश्री, ए.टी.एच-1, पुसारूबी, धनश्री, भाग्यश्री, आर्कारक्षक इत्यादी जातींची निवड करावी.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकांच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. गुलाब पिकाच्या लागवडीसाठी ग्लॅडीयटर, सुपर स्टार, डबल डिलाईट, रेड मास्टर पीस इत्यादी जातींची निवड करावी.

चारा पिके

मका या चारापिकाच्या लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी, कंपोझीट, विजय, गंगासफेद, डेक्कन हायब्रीड या वाणांची निवड करावी.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

तुती रेशीम उद्योग

रेशीम कीटक संगोपन करणाऱ्या बहूतांशी शेतकऱ्यांना रासायनीक खताचे दूष्परिणाम जाणवत नाहीत. निव्वळ रासायनीक खताच्या जोरावर रेशीम कोष उत्पादन शक्य होत नाही. किटकनाशके, बुरशिनाशके किंवा तणनाशके जमिनीच्या आरोग्याला अपायकारक तर आहेतच पण त्याच बरोबर जमिनीत रासायनीक किटकनाशके, खते, बुरशीनाशके व तण नाशकांची जास्त मात्रा हाणीकारक ठरते. त्याचे अंश जमिनीत राहतात व तुती पानात येऊन रेशीम कीटकांच्या पोटात जातात आणि अळ्यांना विषबाधा होते. अळ्या मृत पावतात. बहुतांशी शेतकऱ्यांना हि बाब लक्षात न आल्यामूळे रेशीम उद्योग सुरु केल्या नंतर 2 ते 3 वर्षानंतर सोडून देतात. त्यामूळे शिफारस केलेली शेणखत मात्रा 20 टन प्रति हेक्टर/वर्ष म्हणजे 8 टन प्रति एकर दोन हप्त्यात विभागून जुन व नोव्हेंबर महिण्यात 4-4 टन याप्रमाणे द्यावी. तरच शाश्वत कोष उत्पादन शेतकऱ्यांना शक्य होईल.

सामुदायिक विज्ञान

गर्भावस्थेत सुरूवातीपासूनच स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्या : डॉक्टरांना तुमच्या आरोग्याचा पूर्व इतिहास सांगण्यास व सध्याच्या गर्भावस्थेबाबत माहिती सांगण्याविषयी संकोच टाळावा. गर्भावस्थेत खालील बाबतीत नियमीत आरोग्य तपासणी करून घेऊन  डॉक्टरांच्या सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करा. रक्तदाब (सर्वसाधारण 120/80mm hg). शारीरिक वजन (योग्य वाढ 1 ते 1.5 किलोग्रॅम/महिना). लघवी/रक्ताची तपासणी (रक्ताची तपासणी – प्रकार, गट, रक्तातील लाल द्रव्याचे प्रमाण (हिमोग्लोबिन), आजार इत्यादी कळण्यासाठी. लघवी चाचणी – काही संसर्ग  किंवा आजार कळण्यासाठी. गर्भाशय वाढीची तपासणी (गर्भाची वाढ, स्थिती व हालचाल कळण्यासाठी). धनुर्वाताचे लसीकरण (धनूर्वात टाळण्यासाठी). 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक19/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 03.06.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 व 15 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...