Tuesday, 6 September 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 06 सप्टेंबर रोजी परभणी, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड व औरंगाबाद जिल्हयात; दिनांक 07 सप्टेंबर रोजी लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्हयात तर दिनांक 08 सप्टेंबर रोजी लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 08 सप्टेंबर रोजी हिंगाली, परभणी, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 09 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना; दिनांक 10 सप्टेंबर रोजी औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर दिनांक 09 सप्टेंबर रोजी हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार ते खुप मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 11 ते 17 सप्टेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर कापूस, तुर, भुईमुग व मका पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर केळी, द्राक्ष व सिताफळ बागेत वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते बागेबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत.

भाजीपाला

पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर भाजीपाला पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. फवारणीची कामे पुढे ढकलावीत. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

फुलशेती

पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता पाऊस झाल्यानंतर फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी शेतात अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी. गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

पशुधन व्यवस्थापन

लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग पशूधनात दिसून येत आहे.

कारणे: या रोगाचा संसर्ग "कॅप्रीपॉक्स" (Capri pox) विषाणू मुळे होतो. हा विषाणू शेळ्या व मेंढ्यांमधील देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहे.

पशुपालकांनी घ्यावयाची काळजी : बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे. डास, गोचिड व तत्सम किड्यांच्या बंदोबस्त करणे. तसेच, निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंधक करणे.

प्रतिबंधात्मक उपाय योजना : तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करुन घ्यावेत. त्वचेवरील गाठीचे जखमेत रुपांतर झाल्यास जखमेत जंतू पडू नये यासाठी जखमेवर पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार औषध मलम लावावे. लम्पी या त्वचा रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोट पॉक्स या लसीचे लसीकरण करून घ्यावे.

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामूदायीक विज्ञान

बालकांचा विकास साधण्यासाठी कुटुंबियांनी त्यांना सोप्या भाषेत लहान लहान गोष्टी सांगाव्यात. गोष्टी सांगत असतांना त्या आवाजात चढउतार करून, चेहऱ्यावर योग्य हाव-भाव करून व त्यासाठी चित्रांची मदत घेऊन सांगितल्यास बालकांना त्या अधिक मनोरंजक वाटतात.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक46 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 06.09.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 19 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात, दिनांक 20 जून रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 17 ते 21 जून रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...