Tuesday 27 September 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 26 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना जिल्हयात ; दिनांक 27 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, लातूर जिल्हयात ; दिनांक 28 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 29 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात ; दिनांक 30 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

मराठवाडयात दिनांक 30 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 02  ते 08 ऑक्टोबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बुप्रोफेंझीन 25% 400 मिली किंवा डायफेन्थुरॉन 50% 240 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली  किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणी केलेल्या शेंगा मळणी केलेल्या मुग/उडीद पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  जेथे शक्य आहे तेथे रब्बी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी भुईमूग पिकाची पेरणी 30 सप्टेंबर पर्यंत करावी. काढणीस तयार असलेल्या मधु मका पिकाची काढणी करून घ्यावी. जेथे शक्य आहे तेथे रब्बी ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी. जेथे शक्य आहे तेथे रब्बी सुर्यफुल पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. रब्बी सुर्यफलाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी फळ पिकावरील करपा (सिगाटोका) रोगाच्या व्यवस्थापनासाठी मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणीचे नियोजन करावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

नवरात्री उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन डीसीज होत आहे. यांचा प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण : किटकवर्गीय माशा : यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत करतात. हिमॅटोबीया ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते. अ) शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व शेणाचा  खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे. ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे. टॅबॅनस ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते. अ) पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व गोठयात ठेवावे. स्टोमोक्सीस या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती आपली अंडी घालतात. अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी. ब) या माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा सोडून पशुधनास चरावयास सोडावे.

सामूदायीक विज्ञान

पावसाळयात पचनक्रिया मंदावल्याने अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही. यासाठी यासाठी पावसाळयात पचनास हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक52/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 27.09.2022

 

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...