Monday 21 November 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

 

मराठवाडयात दिनांक 25 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. कापसाच्या झाडावर 40 ते 50 टक्के बोंडे फुटल्यास वेचणी करावी. वेचण्या पंधरा दिवसाच्या अंतराने कराव्यात. पूर्ण फुटलेल्या बोंडातीलच कापूस वेचावा. पहिल्या आणि दूसऱ्या वेचणीचा चांगला आणि कवडी कापूस वेगळा साठवावा.  तूरीवरील शेंगा पोखरणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा  क्विनॉलफॉस 25% 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकात फुलगळ व्यवस्थापनासाठी एनएए 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रब्बी भुईमूग पिक पेरणी नंतर तिन ते सहा आठवडयांनी दोन कोळपण्या आणि एक खुरपणी करावी. रब्बी मका पिकाची पेरणी नोव्हेंबर पर्यंत करता येते पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. मका पेरणी करतांना 75 किलो नत्र, 75 किलो स्फुरद व 75 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे आणि 75 किलो नत्र पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावे, याकरिता 289 किलो 10:26:26 + युरिया 100 किलो किंवा 500 किलो 15:15:15 किंवा 375 किलो 20:20:00:13 किंवा युरिया 163 किलो + 469 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 126 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी आणि 163 किलो युरिया प्रति हेक्टर पेरणीनंतर एक महीण्यांनी द्यावा.  मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी करावी. पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी संरक्षित पाणी द्यावे. रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून 30 दिवस झाले असल्यास नत्राची अर्धी मात्रा 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी द्यावा. रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले असल्यास पहिली कोळपणी करावी. बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. गव्हाची पेरणी करतांना 154 किलो 10:26:26 + युरिया 54 किलो किंवा 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + युरिया 53 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ‍किंवा 87 किलो युरिया + सिंगल सुपर फॉस्फेट 250 किलो + 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. राहिलेले अर्धे नत्र 87 किलो यूरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

सध्या किमान तापमानात झालेल्या घटीमूळे केळी पिकावर याचा परिणाम होऊ नये म्हणून  बागेस सकाळी मोकाट पध्दतीने पाणी द्यावे. आंब्याच्या मोहोरावरील तूडतूडे यांच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा बुप्रोफेंजीन 25% 20 मिली किंवा थायामिथोक्झाम 25% 2 ग्राम  प्रति 10 लिटर पाण्यात  मिसळून फवारणी करावी.    द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावेत.

सामूदायीक विज्ञान

काम करतांना वारंवार उठ-बस करण्यामूळे व्यक्तींच्या स्नायुंवर ताण येऊन थकवा येतो.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक68/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 22.11.2022

 

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...