Thursday 24 November 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

 मराठवाडयात दिनांक 25 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर व दिनांक 02 ते 08 डिसेंबर दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला  तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित वाढलेले आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

जोमदार वाढीसाठी हरभरा पिक सुरुवातीपासूनच तण विरहीत ठेवणे आवश्यक आहे. पिक 20 ते 25 दिवसाचे असतांना पहिली कोळपणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करावी व दोन रोपातील अंतर 20 सेंमी ठेवावे. वेळेवर लागवड केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात तणांच्या प्रादूर्भावानूसार पेरणीनंतर 25 ते 50 दिवसापर्यंत एक ते दोन कोळपण्या व खूरपण्या घ्याव्याव. हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा यांच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली  किंवा बायोमिक्स 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह फवारणी करावी. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).  पूर्व हंगामी ऊसाची लागवड लवकरात लवकर संपवावी. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26  किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश  किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग ग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

शेणखत किंवा कम्पोस्ट खतापेक्षा जास्त अन्न घटक कोंबडी खत किंवा शेळी-मेंढीच्या खतात असतात. तुती बागेस कोंबडी खत चांगले कुजवून वापरता येते. भात पेंढा सोबत काथ्या किंवा क्लोरेटस साजर काजू या कुजवणारी बुरशी मिश्रण 1.5:0.5 या प्रमाणात टाकून कुजवल्यानंतर वापरावे. शेळी-मेंढी खत वापरण्याचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात शेळी-मेंढी खत शेतात घालतात. तर दूसऱ्या प्रकारात शेळ्या-मेंढया शेतात रात्रीच्या वेळी बसवता. पहिल्या प्रकारात शेळी-मेंढीचे मूत्र वाया जाते तर दूसऱ्या प्रकारात शेळी-मेंढीच्या लेंडया/ विष्टा सोबत मातीत मिसळल्या जाते नंतर वखराच्या साहाय्याने सर्व शेतात पसरून द्यावे व हलके पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल.

सामुदायिक विज्ञान

आयूष्यातील उत्तम ध्येय सिध्दीसाठी जीवन चक्राच्या सुरूवातीच्या टप्प्यात जीवनाची दीर्घकालीन उद्दिष्टे विचारपूर्वक निश्चित केली पाहिजेत.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक69/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 25.11.2022

 

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...