Tuesday 30 May 2023

दिनांक 30 मे रोजी औरंगाबाद, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 31 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील 2 ते 3 दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर पुढील दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 30 मे रोजी औरंगाबाद, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 31 मे रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 02  ते 08 जून 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित कमी झालेले आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 04 ते 10 जून 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कोरडवाहू कापूस लागवडीसाठी भारी व काळया जमिनीमध्ये दोन-तिन वर्षानी एक वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणी नंतर मोगडणी करावी. मोगडणीनंतर दोन-तिन वखराच्या पाळया द्याव्यात. शेवटची वखरणी करण्यापूर्वी कोरडवाहू कापूस लागवडीसाठी 5 टन व बागायती लागवडीसाठी 10 टन  चांगले कुजलेले शेणखत शेतात समप्रमाणात पसरावे. तुर पिकाच्या पूर्व मशागतीसाठी एक नांगरणी व वखराच्या 2 ते 3 पाळया द्याव्यात. शेवटच्या पाळी अगोदर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. मुग/उडीद लागवडीसाठी एक नांगरणी व कुळवाच्या 2 पाळया द्याव्यात. शेवटच्या कुळवणी अगोदर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 5 टन जमिनीत मिसळून पाळी द्यावी. भुईमूगाच्या पेरणीसाठी बळीराम देशी नांगराची एक ते दोन नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तिन पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळी पूर्वी प्रति हेक्टरी 10 गाडया शेणखत/कंपोस्ट खत पसरून जमिन भुसभूशीत करावी. सध्याच्या काळात उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी सुरू आहे, वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी, शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. जमिनीची खोल नांगरट करावी. वखराच्या एक ते दोन पाळया देऊन जमिन तयार करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळीच्या नवीन लागवडीसाठी लागवड करण्या अगोदर हेक्टरी 90 ते 100 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत लागवडीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मर होणार नाही तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. केळी बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. आंब्याच्या नवीन लागवडीसाठी 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सूपर फॉस्फेट व 50 किलो शेणखत ‍किंवा कंपोस्ट खत टाकावे व पोयटा मातीने सर्व मिश्रणासहीत खड्डा भरून घ्यावा. नविन लागवड केलेल्या आंबा बागेला पाण्याचा  ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच  बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. वेळेवर एप्रिल छाटणी केलेल्या द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत अतिरिक्त फुटव्यांची विरळणी करावी. सिताफळाच्या नवीन लागवडीसाठी 45X45X45 सें.मी. या आकाराचे खड्डे घेऊन त्यात एक ते दिड घमेले चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, फॉलीडॉल पावडर घालून व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते भरावे.

 

भाजीपाला

खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

फुलशेती

खरीप हंगामात फुलपिकाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व तुरळक ठिकाणी पावसासाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्‍या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. फुल पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळा ऋतुच्या आगमनासोबतच अनेक आजारांचे देखील आगमन होते. म्हणून पशुधनाच्या आरोग्यासाठी त्रिसुत्री 1) भौतीक सुविधा म्हणजेच व्यवस्थीत गोठा ज्यायोग्य किटक व पावसापसून संरक्षण. 2) जैविक सुविधा जसेकी लसीकरण, जंतनाशकाची मात्रा आणि 3)रासायनीक सुविधा म्हणजे आजाराची लागण झाल्यास तात्काळ पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार  लसीकरण आणि पावसाच्या आगमनासोबतच तात्काळ शेळी मेंढी मध्ये तसच वासरांना वयाच्या सातव्या दिवशी द्यावयाची जंतनाशकाची मात्रा आवश्यक ठरते. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबू नये.  

सामुदायिक विज्ञान

उन्हाळयात वातावणातील वाढत्या तापमानामुळे भाजीपाला लवकर सुकून जातो. अशावेळी घरात फ्रिज उपलब्ध नसल्यास भाजीपाला ठेवण्यासाठी जुना माठ किंवा झाडाची रिकामी कुंडी घ्यावी. त्यामध्ये पाणी घालून भाज्या ठैवलेले भांडे अशा पध्दतीने ठेवावे की जेणेकरून त्यात माठातील/कुंडीतील पाणी जाणार नाही. भाजीपाला अशा प्रकारे ठेवल्यास माठातील कुंडीतील तापमान कमी होऊन भाजीपाला  ताजा राहण्यास मदत होते.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील. शेतकऱ्यांनी बोर्ड,भिंती, भेगा, दगडे, बांध इत्यादी ठिकाणी लपून बसलेल्या गोगलगायी शक्य तितक्या प्रमाणात जमा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक17/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 30.05.2023

 

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...