हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील तीन दिवस आकाश
स्वच्छ राहण्याची तर चौथ्या व पाचव्या दिवशी आकाश अंशत: ढगाळ राहून सकाळी धुके
राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयातील उत्तर भागात दिनांक 11 जानेवारी रोजी तूरळक
ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल
तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची
तर पुढील चोविस तासात किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू 2
ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 10 ते 16 जानेवारी 2025 दरम्यान
पावसाची शक्यता नाही, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात हवामान कोरडे
राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची
शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची
योग्य विल्हेवाट लावावी. उशीरा पेरणी केलेल्या तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व
शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नूकसानीची पातळी कळण्यासाठी
प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत. शेंगा पोखरणाऱ्या
अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4
ग्रॅम किंवा स्पिनोसॅड 45% 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% 8 मिली किंवा
क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% 8 मिली किंवा ल्युफेन्यूरॉन 5.4%
12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार
असलेल्या तूर पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी ज्वारी
पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील
किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात
पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक
फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका
पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5
टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी
4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी
करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळी पाणी द्यावे.
केळी बागेस 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास,
याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10
लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे, बागेत परागीकरण व्यवस्थीत होण्यासाठी
कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारण करू नये. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे
द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे
आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत पिंक बेरीची समस्या
होऊ नये म्हणून व उबदार पणा रहावा यासाठी द्राक्ष घड पेपरने किंवा पिशव्याने झाकून
घ्यावेत.
भाजीपाला
वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव
दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व
त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा
क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली
किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व
आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची
काढणी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार
पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
गायी म्हशीमध्ये ऋतूकाळ चक्र 21 दिवसांचे असते. ऋतूकाळ चक्राच्या
एकूण चार अवस्था असतात. ऋतूकाळ चक्राच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये जनावरे माजाची
लक्षणे दाखवतात. माजाचा काळ हा गायी म्हशीमध्ये 24 तासाचा असतो. माजाच्या काळात
गायी म्हशीमध्ये कृत्रीम रेतनाद्वारे जनावरे भरवुन घ्यावीत.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक
क्रमांक – 81/
2024- 2025 मंगळवार,
दिनांक – 07.01.2025
No comments:
Post a Comment