प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस
हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोवीस तासात कमाल तापमानात
फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर दक्षिण भागात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ
होण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3
अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 14 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान पाऊस
सरासीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान
सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी व दिनांक 21 ते 27 फेब्रुवारी 2025 दरम्यान पाऊस
सरासरीएवढे ते सरासीपेक्षा किंचित जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता
आहे.
संदेश : पिकास,
फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. हंगामी ऊसाची लागवड 15
फेब्रूवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत
आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद काढणी करण्यापूर्वी पंधरा
दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. हळद
पिकाची पाने पिवळी पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद
काढणीपूर्वी संपूर्ण पाने जमिनीलगत कापून घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा
पिकास आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या
हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी
शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी
प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी अळी
अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही 500 एल.ई. विषाणूची 10 मिली प्रति 10 लिटर पाणी (200 मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी. तर किडीने आर्थिक
नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट 5 % - 4.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती
एकर 88 ग्रॅम)
किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 3 मिली
प्रती 10 लिटर
पाणी याप्रमाणे (प्रती एकर 60 मिली) किंवा फ्लुबेंडामाईड 20 % - 5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 125 ग्रॅम) फवारावे. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार
असलेल्या हरभरा पिकाची काढणी करून घ्यावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास
त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व
भारी जमिनीत 12 ते 15 दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार
सिंचन पध्दतीने करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
तापमानात होत असलेल्या वाढीमूळे
संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत अन्नद्रव्याचे
व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यामध्ये चिलेटेड झिंक 5 ग्रॅम + चिलेटेड आयर्न 5 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या
काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. चिकू
बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खूरपणी करून
भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची
काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनूसार
पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी
ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा
सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक
तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम उद्योजकांच्या रेशीम अळ्या
कोष न करणे किंवा पोचट कोष होणे हा प्रश्न आहे. बहुतांशी शेतकरी कापूस, ऊस,
सोयाबीन व भाजीपाला ईत्यादी पिकांकडून तुती लागवडीकडे वळलेले आहेत. पुर्वी शेतातील
जमिनीत पीक संरक्षण करण्यासाठी वापरात आलेले किटकनाशक उदा. कोराझीन किंवा
बुरशीनाशक, तणनाशक उदा. ग्लायफोसेट ईत्यादी चे प्रमाण किंवा शिल्लक राहीलेला अंश
जमिनीत राहिलेला असतो. नंतर तेथे तुती लागवड केली जाते आणि तुतीला आलेली पाने
रेशीम किटकास खाद्य म्हणून दिल्यावर किटक
मरताना दिसतात किंवा अळ्या कोष करत नाहीत, पोचट कोष होतात. त्यावर उपाय म्हणजे 20
टन कुजलेले शेणखत प्रति हेक्टर किंवा 5 टन गांडूळ खत समान दोन हप्त्यात जुन व
नोव्हेंबर महिन्यात जमिनीत द्यावे व नंतर हलके पाणी द्यावे.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांचा घरी खुराक तयार
करतांना सरकी/खापरी पेंड दूध वाढत म्हणून 33% पेक्षा जास्त वापरली तर जास्त खर्च होतो आणि रक्तातील अमोनियाचे प्रमाण
वाढून दूधातील जनावरे महिनोंमहिने उलटतात, म्हणून दुग्ध व्यवसायात ही काळजी
घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 92/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 14.02.2025
No comments:
Post a Comment