प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस
हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू
2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे तर पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमान
सरासरीपेक्षा 3 ते 4 अं.से. ने जास्त राहण्याची शक्यता आहे. पुढील चोविस तासात उत्तर
भागात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से.
ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 07 ते 13 फेब्रुवारी 2025 दरम्यान पाऊस सरासीपेक्षा कमी,
कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व दिनांक 14 ते 20 फेब्रुवारी 2025 दरम्यान पाऊस
सरासीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
संदेश : पिकास,
फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण
करावे. हंगामी/सुरू ऊस पिकाची
लागवड करावी. हंगामी ऊसाची लागवड 15 फेब्रूवारी पर्यंत करता येते. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा
प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. हळद पिकाची काढणी करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी पिकाला पाणी देणे बंद करावे. उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास
आवश्यकतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. उशीरा पेरणी केलेल्या
हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी
शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी
प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी
हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना 5
% निंबोळी अर्काची किंवा 300 पीपीएम अझाडीरेकटीन 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.
अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही 500 एल.ई. विषाणूची 10 मिली प्रति 10 लिटर पाणी (200 मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी. तर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी
ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट 5 % - 4.5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर 88 ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 % - 3 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर
60 मिली) किंवा फ्लुबेंडामाईड
20 % - 5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर
125 ग्रॅम) फवारावे. उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकात
माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30%
13 मिली किंवा असिफेट 75%
10 ग्रॅम प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारीच्या
दूसऱ्या आठवड्या पर्यंत करता येते. उन्हाळी
तीळ लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोगाच्या बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो
बियाण्यास 3 ग्रॅम कार्बेन्डेझीम (बाविस्टीन) किंवा 2.5 ग्रॅम थायरम किंवा 4 ग्रॅम
ट्रायकोडर्माची बिज प्रक्रिया करावी. नंतर ॲझॅटोफॉस 20 मिली प्रति किलो बियाणे
प्रमाणे चोळावे.
फळबागेचे व्यवस्थापन
तापमानात होत असलेल्या वाढीमूळे संत्रा/मोसंबी
बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेत अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे यामध्ये चिलेटेड झिंक 5
ग्रॅम + चिलेटेड आयर्न 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब फळांची काढणी झाल्यानंतर बागेतील
वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात व बाग स्वच्छ करावी. डाळींब बागेस
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला
पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून
घ्यावी. नविन लागवड केलेल्या व गादी वाफ्यावरील रोपांना आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट
करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा
क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा
क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक
तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी करून घ्यावी. उन्हाळी
हंगामासाठी गॅलर्डिया फुल पिकाची लागवड करून घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
तुती बागेस वराह किंवा वन्य प्राण्यांकडून
त्रास होत असेल तर जिल्हयातील वन परीक्षेत्र अधिकारी यांच्या नूकसान भरपायी साठी अर्ज
करणे आवश्यक त्यासाठी अर्जासोबत 1) जमीनीचा 7/12 नोंद 2)आधार कार्ड 3) 8-अ 4) पीक पेरा ईत्यादी कागदपत्रे जोडून https://mahaforst.gov.inया
इंटरनेट पोर्टलवर नुकसानी बाबत फोटो शक्य असेल तर देणे.
पशुधन व्यवस्थापन
तापमानात होत असलेल्या वाढीमूळे
जनावरांवर होणारा ताण कमी करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लिव्हर टॉनिक व जिवनसत्वे
आहारातून द्यावेत.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 90/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 07.02.2025
No comments:
Post a Comment