Sunday, 8 November 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची तर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 



हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची तर कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 13 ते 19 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये.

फुलोरा अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास पिकास आवश्यकतेनूसार हलके पाणी द्यावे. तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा व शेंग माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, अळीची आर्थिक नूकसानीची पातळी कळण्यासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत तसेच शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे पक्षी थांबे लावावेत. तुर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एससी 4.4 ग्रॅम किंवा स्पिनोसॅड 45% एससी 3 मिली किंवा इंडाक्झाकार्ब 14.5% एससी 8 मिली किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 3 मिली  किंवा फ्लुबेंडामाईड 20% डब्ल्यूजी 5 ग्रॅम  किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 9.3 % + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 4.6% झेडसी (पूर्वमिश्रित) 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेंग माशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन 5% ईसी 8 मिली किंवा ल्युफेन्यूरॉन 5.4% ईसी 12 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सदरील फवारणी सोबत इतर किटकनाशके, बूरशीनाशके, विद्राव्य खते व सूक्ष्म अन्नद्रव्य अनावश्यकपणे मिसळू नयेत.

पाण्याची उपलब्धता असल्यास मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या कणसांची काढणी करून घ्यावी.

पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. रब्बी ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

पेरणी केलेल्या रब्बी सुर्यफुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. रब्बी सुर्यफुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पाण्याची उपलब्धता असल्यास केळी बागेत आवश्यकतेनूसार सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत पाणी द्यावे. केळी बागेतील अतिरिक्त फुटवे व रोगग्रस्त पाने काढून टाकावीत. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून बाग तण विरहीत ठेवावी. केळी बागेत बोधांना माती लावावी.

आंबा बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. नविन लागवड केलेल्या आंबा बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा सायंकाळच्या पाणी व्यवस्थापन करावे.

द्राक्ष बागेत आवश्यकतेनूसार सकाळी किंवा सायंकाळच्या पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्ष बागेत पानांची विरळणी करून घ्यावी. द्राक्ष बागेची छाटणी केली असल्यास बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पाण्याची उपलब्धता असल्यास सिताफळ बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

फुलशेती

पाण्याची उपलब्धता असल्यास फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

चारा पिके

पेरणी केलेल्या चारा पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुधन व्यवस्थापन

पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 64/2026-2027    सोमवार, दिनांक – 09.11.2026

 

No comments:

Post a Comment