प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 28 व 29 मार्च रोजी नांदेड
जिल्हयात तर दिनांक 28 ते 30 मार्च दरम्यान धाराशिव व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी
हलक्या स्वरूपाच्या पावसाची दिनांक 31 मार्च व 01 एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजी
नगर व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा
वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर 2 ते 3
अं.से. ने घट होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार
नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 28 मार्च ते 03
एप्रिल 2025 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व दिनांक 04 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान पाऊस नाही,
कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची
शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : पुढील पाच
दिवस तूरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित
ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाच्या
पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या
जीवनक्रमात घट पडेल.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण
करावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा
क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस
पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकाची पाने पिवळी
पडून जमिनीवर लोळतात तेव्हा हळदीची काढणी करावी. कंद काढणीपूर्वी संपूर्ण पाने
जमिनीलगत कापून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या हळद पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी. उन्हाळी तीळ पिकास मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी व भारी जमिनीत 12 ते 15
दिवसांच्या अंतराने सिंचन करावे. सिंचन हे शक्यतो तूषार सिंचन पध्दतीने करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या मृग बहार
संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी
बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळयात आच्छादन
करावे. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी
रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. डाळींब बागेत
आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून
राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी डाळींब फळझाडाच्या आळयात
आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या डाळींब रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी
रोपांना सावली करावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी
करावी. चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व
जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी चिकू फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन
लागवड केलेल्या चिकू रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
भाजीपाला
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उन्हाळी हंगामासाठी लागवड
केलेल्या भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. उन्हाळी
भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10
मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक
तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या
फुलांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
तुती रेशीम उद्योग
किटक संगोपनगृहात तापमान 22
सें.ग्रे. ते 28 सें.ग्रे. ठेवणे आवश्यक असून माचै, एप्रिल व मे महिन्यात बाहेरील
तापमान 40-42 असेल 15 सें.ग्रे. ने कमी करावे लागते त्यासाठी कच्च्या शेडनेट गृहात
कमालीची कसरत आणि कौशल्याचा वापर करून म्हणजे वर सिमेंट पत्रे हवेत लोखंडी पत्रे
बदलणे गरजेचे आहे. हळूहळू कच्च्या शेडनेटचे पक्के आरसीसी बांधकाम करून संगोपनगृह
करणे, खाली पक्का कोबा किंवा फरशी करणे त्यास चोही बाजूने 0.5 फुट खोल नाली करणे.
लोखंडी पत्रे असतील तर वरच्या बाजूस कोलगार्ड पेंट करणे म्हणजे तापमान 5 सें.ग्रे.
ने कमी होईल. पत्र्याच्यावर स्प्रिंकलर सेट बसवणे ईत्यादी केले तर मार्च-एप्रिल
महिन्यात संगोपन करणे शक्य होते. तरच रेशीम कीटक व्यवस्थीत पाने खातील व निरोगी
रित्या कोष करतील.
पशुधन व्यवस्थापन
जनावरांना सावलीत बांधावे आणि
पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. पशुधनाकडून सकाळी 11 ते दुपारी 4
या दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठयाच्या
छतावर गवताचे आच्छादन करावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमेंटचे असल्यास
त्याला पांढरा रंग द्यावा. पशुधनास मुबलक प्रमाणा हिरवा चारा, प्रथिनेयूक्त,
खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. तिव्र उष्णतेच्या काळात पशुधनाच्या अंगावर
पाणी शिंपडावे किंवा त्यांना पाणवठयावर न्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी
चरावयास सोडावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 104/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 28.03.2025