Friday, 1 July 2022

मराठवाडयात दिनांक 01, 04 व 05 जुलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 02 व 03 जुलै रोजी तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

 प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

मराठवाडयात दिनांक 01, 04 व 05 जुलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 02 व 03 जुलै रोजी तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 08 ते 14 जुलै दरम्यान पाऊस सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

पेरणीयोग्य पाऊस न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस होण्याची वाट पाहावी व पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकास हेक्टरी 30 किलो नत्र + 60 किलो स्फुरद + 30 किलो पालाश + 20 किलो ग्रॅम गंधक खताची मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी. सोयाबीन पिकाची पेरणी 15 जुलैपर्यंत करता येते. खरीप ज्वारीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा शिफारस केली आहे. त्यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. खरीप ज्वारी पिकाची पेरणी  जुलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. बाजरी पिकास हलक्या जमिनीत 40:20:20 व मध्यम ते भारी जमिनीत 60:30:30 पैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व संपूर्ण पालाश पेरणी करताना द्यावे. बाजरी पिकाची पेरणी 20 जुलैपर्यंत करता येते. ऊस पिकात तणांचे नियंत्रण करावे. हळदीमध्ये आंतरपीके घेताना पहिल्या चार महिन्यापर्यंत वाढ होतील अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये मिरची, घेवडा, कोथंबीर इत्यादी सारख्या आंतरपिकांचा समावेश असावा. हळद या पिकांमध्ये मका हे आंतरपीक घेऊ नये, त्यामुळे उत्पादनात घट येते.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्‍य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्‍यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन डाळींब बागेची लागवड केली नसल्यास लागवड करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी नविन चिकू बागेची लागवड केली नसल्यास लागवड करावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी.

 

चारा पिके

मका या चारापिकासाठी 80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी खत मात्रा पेरणीच्यावेळी द्यावी.

तुती रेशीम उद्योग

प्रौढ रेशीम किटक संगोपनात  तिसरी कात व चौथी कात अवस्था शेतकऱ्यांच्या शेडवर प्रक्रिया पुर्ण होते. या काळात तापमान 25 अं.से. व संगोपनगृहातील आर्द्रता 65 टक्के आवश्यक आहे. कातेवर बसताना खाद्य हळूहळू थांबवून बंद करावे व पांढऱ्या चुन्याची धुरळणी करावी. बेड सुकलेल्या अवस्थेत असावे हयाची काळजी घ्यावी म्हणजे व्यवस्थीत कात अवस्था पार पडते. 248 तास कालावधीत कात टाकल्यानंतर कातेवरून उठताना खाद्य देण्या अगोदर अर्धातास विजेता किंवा अंकुश सारखे निर्जंतूक पावडर 5-7 ग्रॅम प्रति चौ.फुट याप्रमाणे अळ्यांवर धुरळणी करावे. 100 अंडी पुंजासाठी 4 ते 4.5 कि.ग्रॅ. निर्जंतूक पावडर लागते.

सामुदायिक विज्ञान

रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये विविध पानांची (पावडर) भुकटीचा उपयोग करता येतो. जसे, कढीपत्यांची पाने, कोबीची पाने,  राजगिऱ्याची पाने, शेवग्याची पाने, हरबऱ्याची पाने आणि बिटाची पाने इत्यादी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक27/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 01.07.2022

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 11 व 15 एप्रिल रोजी मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 12 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...