हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी बीड, नांदेड,
लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 04 ऑक्टोबर रोजी परभणी, बीड, हिंगोली, नांदेड,
लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक
(ताशी 30 ते 40
कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक
03 व 04 ऑक्टोबर
रोजी काही ठिकाणी तर दिनांक 05 ते 07 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन ते तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर
फारशी तफावत जाणवनार नाही व पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत
जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 03 ते 09 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व
किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचीत जास्त व दिनांक 10 ते 16 ऑक्टोबर, 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा
कमी तर कमाल
तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
किंचीत जास्त राहण्याची शक्यता आहे.
संदेश : फवारणीची
कामे टाळावीत किंवा पुढे ढकलावीत किंवा फवारणीची व आळवणीचे कामे पावसाची उघाड व वापसा बघून करावीत. काढणी केलेल्या
सोयाबीन पिकची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकची काढणी लवकरात लवकर करावी व
सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी.
सोयाबीन पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा
निचरा करावा.
कापूस पिकात अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. कापूस पिकात आंतरिक बोंड सड दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% - 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 2 ग्रॅम प्रति
10 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. बाह्य बोंडसड रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन 20% - 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन
5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)- 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन
18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा प्रोपीनेब
70% - 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी
बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात.
कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून पंधरा
दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात.
तूर पिकात अतिरिक्त पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. जमिनीत साचलेल्या पाण्यामुळे किंवा ओलाव्या मुळे तूर
पिकात फायटोप्थेरा रोग मोठ्या प्रमाणात पसरतो, प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी
500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मेटालॅक्झील एम 4 टक्के + मॅन्कोझेब 64 टक्के (पुर्व मिश्रीत बुरशीनाशक) प्रति एकर या प्रमाणात खोडावर आणि झाडावर
फवारणी करून आळवणी पण करावी. किंवा ट्रायकोडर्मा 500 ग्रॅम (25
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) पाण्यात मिसळून प्रति
एकर या प्रमाणात पावसाची उघाड बघून फवारणी व आळवणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या
कमतरतेमूळे तूर पिक पिवळे दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए
चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 @ 50 ग्रॅम किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100 ग्रॅम प्रति
10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
खरीप ज्वारी पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून
फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी
करावी.
ऊस पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त
पाण्याचा निचरा करावा.
हळद पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या
बुरशीचा प्रसार कमी करता येईल. कंदकूजचा प्रादूर्भाव दिसून आल्यास, याच्या
व्यवस्थापनासाठी जमिनीतून कार्बेडेंझीम 50%
-200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड
50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून
एकदा आळवणी करावी. (आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी
केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.) हळद पिकास 25 किलो नत्र प्रति
हेक्टरी सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे.
हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी
जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत नाही. पाणी साठवून ठेवणाऱ्या
जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास कोरडे व थंड हवामान मानवते.
करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा आणि ओलावा टिकवून ठेवणारी
जमीन निवडावी. खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन काढणीनंतर करडई पीक घ्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी
व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 1.5किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5
ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
डाळींब बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. डाळींब बागेत 00:00:50 1.5 किलो प्रती 100 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेतील अतिरिक्त फुटवे
काढावेत.
चिकू बागेत अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करून
घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
भाजीपाला
भाजीपाला पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून
घ्यावी. जमिनीत वापसा असतांना भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण
करावे. रब्बी भाजीपाला पिकाच्या लागवडीची पूर्वतयारी करून घ्यावी.
फुलशेती
फुल पिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व
अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून
घ्यावी.
तुती रेशीम उद्योग
भरपूर रेशीम उद्योजक शेतकरी तूती बागेस पशूधन व शेणखत उपलब्ध
नसल्यामूळे देण्याचे टाळत आहेत आणि पर्यायी बाजारात उपलब्ध जाहिरातीच प्रभावामूळे
तुती बागेत इतर निविष्ठा देत आहेत. जमिनीची प्रत खराब होण्यामध्ये मोठ्या
प्रमाणावर जबाबदार रासायनिक खतच आहेत. नऋयुक्त खताच्या अनिर्बंध वापर वाढला असून
त्यामूळे कपाशी, सोयाबीन सारखे पीके किडीस बळी पडत आहेत. रेशीम किटक संगापनानंतर
तुतीची पाने, फांद्या, रेशीम कीटक विष्ठा प्रती एकर 6 टन तर हेक्टरी 15 टन पर्यंत
शिल्लक राहते. त्यापासून कंम्पोस्ट खत किंवा गांडूळखत तयार करता येतो त्यासाठी 16 X 8 X 4 फुट आकाराच्या दोन खड्डयात 6 महिने तुतीचे
शिल्लक अवशेष कुजवल्यास उत्तम प्रकारचा खत तयार होतो.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळयात पशुचे खाद्य नियोजन व्यवस्थित ठेवावे व जनावरांचे खाद्य
स्वच्छ व कोरडे असावे. पशुधनास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशकाची औषधी देण्यात
यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 54/2025
- 2026 शुक्रवार, दिनांक
– 03.10.2025
No comments:
Post a Comment