Thursday 25 August 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 25 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, लातूर जिल्हयात तर दिनांक 27 ऑगस्ट रोजी नांदेड व हिंगोली जिल्हयात तर दिनांक 28 ऑगस्ट रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 26 ऑगस्ट ते 01 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी तर दिनांक 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार दिनांक 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला होता त्यानंतर तो काही प्रमाणात कमी झालेला आहे. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिक सध्या फुलोरा ते शेंगा धरणे या अवस्थेत असल्याने पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास सोयाबीन पिकास संरक्षित पाणी द्यावे. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त झाडे तात्काळ उपटून नष्ट करावीत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर 15-20 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.60% + लँबडा सायहॅलोथ्रीन 9.50% झेडसी 2.5 मिली  किंवा बिटासायफ्लूथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% 7 मिली प्रति 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन  पिकावरील पाने खाणाऱ्या अळ्या (स्पोडोप्टेरा, उंटअळी, केसाळअळी, घाटेअळी) यांच्या व्यवस्थापनासाठी फ्लुबेंडामाईड  39.35% 3 मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% + सल्फर 65% 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.   उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 % 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 % 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत फळ गळ दिसून येत असल्यास एनएए 4 ते 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत वर खताची मात्रा दिली नसल्यास 400 ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावी. डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत वर खताची मात्रा दिली नसल्यास 300 ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावी. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. चिकू बागेत वर खताची मात्रा दिली नसल्यास 650 ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावी.

 

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मिरची पिकावरील मर (ॲन्थ्रॅकनोझ) व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चारा  पिकासाठी उशीरा लागवड केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत व 5% निंबोळी अर्काची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. 

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

यशस्वी कोष उत्पादन घेण्यासाठी तुती लागवडीनंतर दर दिड महिण्यात तुती छाटणी करावी. लागवडीच्या दूसऱ्या वर्षापासुन पुढे 15 ते 20 वर्षा पर्यंत मिळू शकते. पण तुतीच्या वाढीसाठी आवश्यक अन्नघटक नत्र, स्फुरद, पालाश या रासायनीक खताची मात्रा 140 कि.ग्रॅ. अमोनियम सल्फेट 170 कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि 19 कि.ग्रॅ. म्यूरेट पोटॅश प्रति एकर प्रति कोषाचे पीक याप्रमाणे देणे. जुन व नोव्हेंबर महिण्यात 4 क्विंटल प्रमाणे एकूण 8 क्विंटल कुजलेले शेणखत टाकणे आवश्यक आहे. इतर जैविक खते व हिरवीचे खते टाकणे त्याचबरोबर जून व जानेवारी महिण्यात पट्टा पध्दत लागवडीत बरू किंवा ढेंचा हे द्विदल पीके पेरणी करून फुलोरा येण्याच्या वेळी (दिड महिण्या नंतर) जमीनीत गांडूळ टाकणे.

सामुदायिक विज्ञान

भेंडी व वांगी तोडणी जरी सोपी वाटत असली तरी हे काम अतिशय कठीण आहे. भेंडीवर असणारी बारीक लव हातांना खाज आणते. भेंडी तोडल्यानंतर देठामधून निघणारा चिकट द्रव यामुळे भेंडी बोटामधून निसटते व भेंडी तोडणे अवघड होते. भेंडी आणि बोटांचे सतत घर्षण झाल्यामूळे बोटे रक्ताळतात आणि बोटांची आग होते, तर वांगी तोडतांना बोटांमध्ये काटे घुसतात. यावर उपाय म्हणून शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी जनाई मोजाचा वापर करावा.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक43/2022 - 2023      गुरूवार, दिनांक – 25.08.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...