Tuesday 30 August 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 30 व 31 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे. 

मराठवाडयात दिनांक 02 सप्टेंबर ते 08 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 04 ते 10 सप्टेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे. तुर पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग  पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे ड्रम फिरवावे. त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते परिणामी उत्पादनात वाढ होते. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकाच्या कणसांची काढणी करून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.  द्राक्ष बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.  सिताफळ बागेत आंतरमशागतीच कामे करून तण नियंत्रण करावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भेंडी पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

गणपती उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.

पशुधन व्यवस्थापन

लम्पी स्कीन डिसीज सदृश रोग गायवर्गीय व म्हैसवर्गीय पशूधनात दिसून येत आहे. हा साथीचा विषाणूजन्य रोग असून याचा प्रसार मूख्यत्वे रक्त पिपासू चावणऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यामूळे होतो. याच्या व्यवस्थापनासाठी रोग बाधीत पशुधन  निरोगी पशुधनापासून विलगीकरण करावे अथवा त्यांना एकत्रित चरावयास सोडू नये. रोगबाधीत पशुधनाची ने आण बंद करावी. तसेच साथीच्या काळात गावातून/परिसरातून गोठयास भेटी देणाऱ्याची संख्या मर्यादीत करावी. बाधीत पशुधनाची सुश्रुषा करणाऱ्य पशुवैद्यक डॉक्टरांनी विशिष्ट पोशाख परिधान करावा व सुश्रूषेनंतर हात अल्कोहोत मिश्रीत सॅनीटायझरने धूवून टाकावेत तसेच पादत्राने व पोशाख, गरम पाण्याने निर्जंतूक करून घ्यावा. बाधीत पशुधनाच्या संपर्कामध्ये आलेले वाहन व परिसर तसेच  ईतर साहीत्य निर्जंतूक करावे. रोग नियंत्रणासाठी रक्त पिपासू चावणाऱ्या किटकवर्गीय माशा, डास, गोचीडे यांचे निर्मुलन करावे. पशुधन व परिसरावरती रासायनिक/वनस्पतीजन्य किटकनाशकाची फवारणी करावी.

सामूदायीक विज्ञान

भेंडी व वांगी तोडणी जरी सोपी वाटत असली तरी हे काम अतिशय कठीण आहे. भेंडीवर असणारी बारीक लव हातांना खाज आणते. भेंडी तोडल्यानंतर देठामधून निघणारा चिकट द्रव यामुळे भेंडी बोटामधून निसटते व भेंडी तोडणे अवघड होते. भेंडी आणि बोटांचे सतत घर्षण झाल्यामूळे बोटे रक्ताळतात आणि बोटांची आग होते, तर वांगी तोडतांना बोटांमध्ये काटे घुसतात. यावर उपाय म्हणून शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी जनाई मोजाचा वापर करावा.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक44 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 30.08.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...