Monday 23 January 2023

दिनांक 25 जानेवारी रोजी बीड व औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील पाच दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. दिनांक 25 जानेवारी रोजी बीड व औरंगाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 27 जानेवारी ते 02 फेब्रूवारी 2023 दरम्यान किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहून तूरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीती ओलावा कमी झालेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या तूर पिकाची व काढणी केलेल्या रब्बी भुईमूग,  हळद व रब्बी सूर्यफुल पिकाची सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोढेट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकास फुलोरा येण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 70 ते 75 दिवस) व कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. गहू पिकास कांडी धरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 40 ते 45 दिवस) व पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 25% ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी एस.बी.11, टीएजी 24, एलजीएन-1, टीएलजी-45, टीजी 26, जेएल 24, जेएल 220 या वाणांपैकी वाणाची निवड करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत फळवाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाऊस झाल्यास केळी बागेत करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनेझोल 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. आंबा बागेत फळगळ होऊ नये म्हणून 00:52:34 1.5 किलो + जिब्रॅलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. द्राक्ष बागेत भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी हेक्झाकोनॅझोल 5 ईसी 1 मिली किंवा डायफेनकोनॅझोल 25 ईसी 0.5 ग्रॅम किंवा टेट्राकोनॅझोल 3.8 ईडब्ल्यू 0.75 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता भाजीपाला पिकात रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. कमाल तापमानात झालेल्या वाढीमूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

गाय व म्हैस वर्गीय पशुधनामध्ये आतडयातील सीस्टाकझोमोसीस या आजाराचा प्रादूर्भाव सर्व वयोगटामध्ये आढळत आहे या रोगाची प्रमूख लक्षणे म्हणजे रक्त/आव मिश्रीत हगवण. या रोगावरती प्रभावी जंतनाशक उपलब्ध असून पशूवैद्यकीय तज्ञाकडून विष्ठेची तपासणी व सुश्रुशा करून घ्यावी. सर्वात महत्वाचे म्हणजे सासलेल्या तळे, ओढा, डबके इत्यादी ठिकाणी पशुधनास पाणी पिण्यासाठी न नेणे हा महत्वाचा उपाया करावा.

सामुदायिक विज्ञान

गर्भावस्थेच्या सुरूवातीच्या दोन महिन्यात गर्भाचे प्रमुख अवयव जसे की ऱ्हदय, मज्जातंतू नलिका, डोळे, नाक, कान, हात, पाय यांच्या प्राथमिक विकसनास सुरूवात होते. त्यामूळे अगदी सुरूवातीपासून गर्भवतीची सर्वतोपरी काळजी घेणे नितांत गरजेचे आहे.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक86/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 24.01.2023

 

 

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...