Tuesday 22 August 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 22 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 27 ऑगस्ट ते 02 सप्टेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण किंचित वाढलेले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा लागवड केलेल्या कापूस व उशीरा पेरणी केलेल्या तूर, भुईमूग व मका पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. कापूस, तूर, मुग/उडीद व भुईमूग पिकात दहा दिवसापेक्षा जास्त पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. पाण्याच्या ताणामूळे पाने सुकत असल्यास पिकास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा ॲसिटामाप्रीड 20% 40 ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7% 168 मिली प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर फवारणी करावी. मका पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या केळी, आंबा व सिताफळ बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. पाऊस न झालेल्या ठिकाणी केळी, आंबा, द्राक्ष व सिताफळ बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. भाजीपाला पिकात दहा दिवसापेक्षा जास्त पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

नविन लागवड केलेल्या फुल पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. फुल पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा ईत्यादी) गोष्टी कराव्यात. 6) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.

सामुदायिक विज्ञान

भेंडी व वांगी तोडणी जरी सोपी वाटत असली तरी हे काम अतिशय कठीण आहे. भेंडीवर असणारी बारीक लव हातांना खाज आणते. भेंडी तोडल्यानंतर देठामधून निघणारा चिकट द्रव यामुळे भेंडी बोटामधून निसटते व भेंडी तोडणे अवघड होते. भेंडी आणि बोटांचे सतत घर्षण झाल्यामूळे बोटे रक्ताळतात आणि बोटांची आग होते, तर वांगी तोडतांना बोटांमध्ये काटे घुसतात. यावर उपाय म्हणून शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी जनाई मोजाचा वापर करावा.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक41/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक 22.08.2023

 

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...