प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 03 ते 09 नोव्हेंबर दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा
किंचित जास्त तर दिनांक 10 ते 16 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान
व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 08 ते 11 नोव्हेंबर
2023 दरम्यान कमाल तापमान
सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेले सोयाबीन उन्हात
वाळवूनच मळणी करावी. पुढील हंगामात बियाण्यासाठी
सोयाबीनचा वापर करण्यासाठी आर्द्रतेचे प्रमाण 14 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 400
ते 500 आरपीएम तर आर्द्रतेचे प्रमाण 13 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 300 ते 400
आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता
येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे
जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. काढणी
केलेल्या खरीप ज्वारीची कणसे वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेल्या दाण्यांची
उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून
बियाण्याचे संरक्षण होईल. काढणी केलेल्या बाजरीची कणसे वाळल्यानंतर मळणी करावी.
मळणी केलेल्या दाण्यांची उन्हात वाळवून साठवणूक करावी जेणेकरून साठवणूकी दरम्यान
होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पुढील पाच दिवस कोरडे हवामान
राहण्याची शक्यता लक्षात घेता ऊस व
हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून
आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे,
याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत
असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25%
20 मिली किंवा डायमिथोएट 30
% 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी
करावी. उघडे पडलेले कंद मातीने झाकून
घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे
विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). खरीप पिकांची काढणी केल्यानंतर
पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास हरभरा पिकाची पेरणी लवकरात
लवकर करून घ्यावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 10 नोव्हेंबर पर्यंत करता येते.
बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X 10 सेंमी अंतरावर करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो
नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी. खरीप
पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास
करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. बागायती करडई पिकाची पेरणी 5
नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणी 45X 20 सेंमी अंतरावर करावी. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा
60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे
व 30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे. पाण्याची उपलब्धता असेल तरच गहू पिकाच्या लागवडीचे नियोजन करावे. बागायती
गहू वेळेवर पेरणीचा कालावधी हा 01 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर आहे. वेळेवर
पेरणीसाठी त्र्यंबक, तपोवन, गोदावरी, फुले समाधान, एम ए सी एस 6222, एम ए सी एस
6474, इत्यादी वाणांपैकी निवड करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील पाच दिवस कोरडे हवामान
राहण्याची शक्यता लक्षात घेता संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेस आवश्यकतेनूसार
पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या
संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत तणनाशकाची फवारणी करू नये. काढणीस तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची
काढणी करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी. नविन
लागवड केलेल्या चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार
असलेल्या चिकू फळांची काढणी करून घ्यावी.
भाजीपाला
पुढील पाच दिवस कोरडे हवामान
राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता
असल्यास पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला
पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी.
मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी
ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम
किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5%
एस. जी. 200 ग्रॅम प्रति
हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पुढील पाच
दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी
द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची
काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
तुती रेशीम
उद्योग
रेशीम किटक थंड रक्ताचा किटक असून
संगोपनगृहातील तापमान 20 सें.ग्रे. च्या खाली व 35 सें. ग्रे. च्या वर गेले असता
तुती पाने खात नाहीत. हवामानाच्या बदलल्या ढगाळ वातावरणात संगोपनगृहात तापमापी व
आर्द्रता यंत्र (ईलेक्ट्रानिक) असणे गरजेचे आहे. तापमान व आर्द्रतेचया अंदाज न
आल्यामूळे खडू रोग, ग्रासरी किंवा फ्रॅचरी रोग प्रादूर्भाव रेशीम किटकास जाणवतो.
दोन कोषाच्या पिकात 8 दिवसाचे अंतर ठेवावे व या काळात ब्लिचिंग पावडर 2 टक्के व
कळीचा चुना 0.3 टक्के या प्रमाणे 100 लिटर पाण्यात 200 ग्रॅम ब्लिचिंग पावडर व 300
ग्रॅम चुना वापरावा नंतर 50 ग्रॅम 100 लिटर पाण्यात अस्त्रची फवारणी 48 तासानंतर
करावी.
पशुधन व्यवस्थापन
पुढील काळात थंडी पासुन पशुधनाचे
संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे,
त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. पशुसाठी चारा व्यवस्थापन : मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस
झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या
पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये
जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे
काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात
आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी तयारी केली पाहिजे.
सामुदायिक विज्ञान
पीक कापणी आणि मळणी करतांना
शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा
होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे,
श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक
वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा,
कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 62/2023 - 2024 शुक्रवार, दिनांक – 03.11.2023
No comments:
Post a Comment