प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने घट होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 10 ते 16 नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान
सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 12 ते 18
नोव्हेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर
जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वेचणीस तयार असलेल्या कापूस
पिकात वेचणी करून घ्यावी. वेचणी केलेला कापूस साठवणूकीपूर्वी उन्हात वाळवून
साठवणूक करावी जेणेकरून कापसाची प्रत खालावणार नाही. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता फुलोरा व शेंगा
धरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता
घ्यावी. पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत
ओलावा असल्यास मका पिकाची पेरणी नोव्हेंबर अखेरपर्यंत करता येते. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे
वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. रब्बी ज्वारी पिकात पेरणी नंतर 15 ते 20
दिवसांनी पहिली कोळपणी करावी. रब्बी सूर्यफूल पिकाची पेरणी करून 20 दिवस झाले
असल्यास पहिली कोळपणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
पुढील पाच दिवस हवामान कोरडे
राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या केळी बागेत तण व्यवस्थापन करून
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. द्राक्ष बागेत फळधारणा व्यवस्थित होण्यासाठी बागेस
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पुढील पाच
दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता नविन लागवड केलेल्या सिताफळ बागेस
आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पूर्ण वाढलेल्या व काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची
काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. आंबा फळबागेत चांगला मोहोर
लागण्यासाठी बागेस पाणी देऊ नये. आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी
13:00:45 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
पुढील पाच दिवस कोरडे हवामान
राहण्याची शक्यता लक्षात घेता भाजीपाला पिकात तण व्यवस्थापन करून आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. पाण्याची उपलब्धता
असल्यास पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला
पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी.
काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पुढील पाच दिवस कोरडे हवामान
राहण्याची शक्यता लक्षात घेता फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी
टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.
पशुधन
व्यवस्थापन
पशुसाठी चारा व्यवस्थापन :
मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा
टंचाई भासू शकते. यासाठी असलेल्या पडकातील गवत, द्विदल व तत्सम पशुची चारा पीके
याचे सायलेज (मूरघास) स्वरूपामध्ये जतन, तसेच रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक
घेऊन कडबा उत्पादन करणे, ईतर पीकांचे काड घेऊन त्यावर युरीया-मोलॅसेस यांची
ट्रीटमेंट करून वापरणे. ईत्यादी उपाय अमलात आणण्याची गरज आहे व त्यासाठी सर्वांनी
तयारी केली पाहिजे.
सामुदायिक विज्ञान
पीक कापणी आणि मळणी करतांना
शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा
होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे,
श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक
वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा, कापडी
अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 63/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 07.11.2023
No comments:
Post a Comment