प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 01 जून रोजी
तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 02 जून रोजी नांदेड,
लातूर व धाराशिव जिल्हयात तर दिनांक 03 जून रोजी नांदेड, लातूर, धाराशिव व बीड जिल्हयात
तर दिनांक 04 जून रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा,
मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मौसमी पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील तीन दिवसात
कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यांनतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3
अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3
अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 31 मे ते 06 जून दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा कमी,
कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची
व 07 ते 13 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व
किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या
उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार
मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 05 ते 11 जून
2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान
व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश :
सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी
शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तिन वर्षात एकदा खोल
(30 ते 45 सें.मी.) नांगरणी करावी. नांगरणीनंतर दोन ते तिन वखराच्या पाळया देऊन
जमिन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 20 गाडया (5 टन) शेणखत किंवा
कंपोस्टखत जमिनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी
बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप
ज्वारी पेरणीसाठी एकदा नांगरणी करून 2 ते 3
वखराच्या पाळया देऊन जमिनीची मशागत करावी. शेवटच्या पाळीपूर्वी हेक्टरी 10 ते 15
गाडया चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. बाजरीच्या पेरणीसाठी जमिनीची नांगरट
करावी व वखराच्या 2 पाळया द्याव्यात. शेवटच्या वखरपाळीपूर्वी हेक्टरी 5 टन चांगले
कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. अडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची उन्हाळयात खोल नांगरट करून जमिन तापल्यानंतर
ढेकळे फोडावीत. कूळवाच्या उभ्या-आडव्या पाळयानंतर सपाटीकरण करावे. दूसऱ्या
नांगरणीपूर्वी अडसाली लागवडीसाठी प्रति हेक्टरी 25 टन शेणखत जमिनीत मिसळावे. हळद लागवडीसाठी जमिनीची 18 ते 22 सें.मी.
पर्यंत खोल नांगरट करून घ्यावी. नांगरटीनंतर शेतातील तणांचे अवशेष वेचून जाळून
नष्ट करावेत. नांगरीनंतर कुळवणी करावी. त्यानंतर ढेकळे फोडून घ्यावीत.शेवटच्या
पाळीपूर्वी हेक्टरी 30 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून घ्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी लागवडीसाठी 1X1X1 मीटर या आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट,
3 ते 4 घमेली शेणखत किंवा कंपोस्टखत व पोयटा माती यांनी खड्डे भरून घ्यावे.
संत्रा/मोसंबी मृग बहार नियोजनासाठी शेतकऱ्यांनी बागेत नांगरणी करावी व शेणखत
टाकण्यासाठी जमिन तयार करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी बागेला
पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी
घ्यावी. नविन लागवड केलेल्या बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा
सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून
संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत
खोडाजवळ आच्छादन करावे. डाळिंब लागवडीसाठी घेतलेले खड्डे चांगली माती + चांगले कुजलेले व रापलेले
शेणखत + 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + पालापाचोळा यांनी जमिनीपासून वर 15 ते
20 सेंमी खड्डे भरून घ्यावेत व मधोमध एक बांबूची काठी लावावी. डाळींब मृग बहार
नियोजनासाठी शेतकऱ्यांनी बागेत नांगरणी करावी व शेणखत टाकण्यासाठी जमिन तयार करून
घ्यावी. नविन लागवड केलेल्या डाळींब बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड
केलेल्या बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन
करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी
तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. चिकू लागवडीसाठी घेतलेले 1X1X1 मीटर आकाराचे खड्डे अर्धा किलो
सुपर फॉस्फेट, 1:3 या प्रमाणात शेणखत + माती या मिश्रणाने खड्डे भरावे. नविन लागवड
केलेल्या चिकू बागेला पाण्याचा ताण बसणार
नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी
लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना
उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच
बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.
भाजीपाला
टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी जमिन
खोलवर नांगरून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून
घ्यावेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस
तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला
पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
फुलशेती
खरीप हंगामात फुलपिकांच्या
लागवडीसाठी फुलपिकानूसार जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी. तूरळक ठिकाणी वादळी
वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी
करून घ्यावी. फुल पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास
आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.
चारा पिके
चारा पिकाच्या लागवडीसाठी एक
नांगरट करून दोन ते तिन वेळा वखरणी करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी जमिनीत हेक्टरी 20
ते 25 टन कंपोस्ट खत मिसळावे.
तुती रेशीम उद्योग
पलटी नांगराच्या साहाय्याने
जमिनीची नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी. जमिन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन/हे.
शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी द्यावे.
गांडूळ खत पाच मेट्रीक टन/हे. म्हणजे दोन टन/एकर दोन समान हप्त्यात द्यावे.
तूती लागवडीसाठी तूती रोप
वाटीका 3 आर
क्षेत्रावर लागवडीच्या तीन महिने अगोदर करावी. वर्षात तीन वेळा रोप वाटीका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन महिन्यानंतर
शेतात रोपे लागवड करावी. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तूती लागवड करता येते.
पशुधन व्यवस्थापन
तापमानात वाढ झाल्यामूळे दूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन
कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते.
हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील
छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी जनावरांना धुवून
काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला
पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट
उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे.
तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या
काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू
नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या
शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू
होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.
कृषि अभियांत्रिकी
शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी
करून घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट
होईल. ज्या भागात मागील वर्षी शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव आढळून आला होता अशा ठिकाणी
शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील. शेतकऱ्यांनी बोर्ड,भिंती,
भेगा, दगडे, बांध इत्यादी ठिकाणी लपून बसलेल्या गोगलगायी शक्य तितक्या प्रमाणात
जमा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट
कराव्यात.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 18/2024
- 2025 शुक्रवार, दिनांक
– 31.05.2024