Friday, 24 May 2024

मराठवाडयात आज तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 24 मे रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात आज तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 24 मे रोजी नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 24 ते 30 मे दरम्यान पाऊस नाही, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी ते सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी ते सरासरीएवढे राहण्याची व 31 मे ते 06 जून दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 मे ते 04 जून 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश :

सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकाची पेरणी सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते. परंतु अत्यंत हलक्या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. जास्त आम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय कर्बाची मात्रा चांगल्या प्रमाणात असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.  खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी, उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी.  बाजरी या पिकाच्या पेरणीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. अडसाली ऊस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (60 ते 120 से. मी.) जमिन निवडावी. पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या ऊस पिकास पाणी व्यवस्थापन करावे. हळद लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमिन निवडावी, तसेच जमिनीत हराळी, कुंदा, लव्हाळा अशी बहू वार्ष‍िक तणे असू नयेत. जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 असलेल्या जमिनीत हळदीचे पिक उत्तम येते.  

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी लागवडीसाठी मध्यम ते खोल भारी उत्तम निचऱ्याची व 1 मी. खोलीची चांगली जमिन निवडावी.  अतिआम्ल तथा क्षारयूक्त, चुनखडीयुक्त जमिन निवडू नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. डाळींब लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमिन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 च्या दरम्यान असावा. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही. चिकूच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची खोल, मध्यम काळी जमिन निवडावी, चुनखडीयुक्त जमिनीची निवड करू नये. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावली करावी तसेच खोडाभोवती आच्छादन करावे यामुळे कलमांची मर होणार नाही.

 

भाजीपाला

खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी, निचऱ्याची भुसभुशीत जमिन निवडावी. काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज इत्यादींची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.

फुलशेती

खुल्या शेतातील गुलाब लागवडीसाठी मध्यम ते हलकी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी.

चारा पिके

खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, बाजरीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.

तुती रेशीम उद्योग

पलटी नांगराच्या साहाय्याने जमिनीची नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी. जमिन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन/हे. शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी द्यावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन/हे. म्हणजे दोन टन/एकर दोन समान हप्त्यात द्यावे. तूती लागवडीसाठी तूती रोप वाटीका 3 आर क्षेत्रावर लागवडीच्या तीन महिने अगोदर करावी. वर्षात तीन वेळा रोप वाटीका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन महिन्यानंतर शेतात रोपे लागवड करावी. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत तूती लागवड करता येते.

पशुधन व्यवस्थापन

तापमानात वाढ झाल्यामूळे दूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन कमी होते व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण करावा, दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे.

तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला थांबू नये.

सामुदायिक विज्ञान

दोन टक्के आवळयाच्या पानाच्या अर्काचा वापर सुती कापडावर केल्यास ग्राम पोझीटिव्ह या सूक्ष्मजीवाची सुती कापडावरील वाढ प्रतिबंघित करता येते. आवळयाच्या पानाच्या अर्कासह 6 % सीट्रिक ॲसिड घेऊन सुती कापडावर संस्करण केले असता ग्राम पोझीटिव्ह या सुक्ष्मजीवाच्या वाढीला होणारा प्रतिबंध कापडाच्या  पाच धुण्यानंतर कमी झाल्याचा आढळून आला. आवळयाच्या पानाच्या अर्काचे संस्करण काही वैशिष्टयपूर्ण कपडयांना उदा. अवगुंठन, पायमोजे, लंगोट, जखमेवर बांधावयाच्या सुती पटृटया यावर केले असता सूक्ष्मजीवांपासून होणारी हानी टाळता येऊ शकते.

कृषि अभियांत्रिकी

शेतात लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यावी. त्यामूळे जमिन तापन्यास मदत होऊन किडींचे कोष व घातक बूरशीचा नायनाट होईल. ज्या भागात मागील वर्षी शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव आढळून आला होता अशा ‍ठिकाणी शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी उन्हाळ्यात (मे महिन्यात) जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून गोगलगायीच्या सूप्तावस्था नष्ट होतील.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक14/2024 - 2025         शुक्रवार, दिनांक 17.05.2024

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...