Friday, 9 October 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 1 ते 3 अं.से. ने घट होण्याची तर ‍दिनांक 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान 1 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर 1 ते 3 अं.से. ने घट होण्याची तर ‍दिनांक 10 ते 12 ऑक्टोबर दरम्यान 1 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 09 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची व दिनांक 16 ते 22 ऑक्टोबर दरम्यान पाऊस, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

संदेश : पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. पाण्याच्या उपलब्धतेनूसार रब्बी हंगामातील पिकांची (रब्बी ज्वारी, करडई, सूर्यफूल व हरभरा) पेरणी 1 ते 15 ऑक्टोबर पर्यंत करता येते

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या सोयाबीन पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या सोयाबीन पिकाची मळणी करून घ्यावी.

पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकास दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसत असल्यास हलके पाणी द्यावे.

पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या बाजरी पिकाची काढणी करून घ्यावी.

ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% 60 मिली किंवा ॲसिफेट 75% 400 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी मात्र मित्र किडींची संख्या जास्त असल्यास अनावश्यक दुसरी फवारणी टाळावी एकाच प्रकारच्या किटकनाशकाची वारंवार फवारणी न करता वेगवेगळया कार्यपध्दतीच्या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघुन फवारावे. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, रोगग्रस्त पाने वेळोवेळी गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत व शेत स्वच्छ ठेवावे. याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50% 400 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 75 % 500 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % 500 ग्रॅम फवारणी करताना चांगल्या प्रतीचे चिकटवणारे द्रव्य मिसळावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास ॲझॉक्सीस्ट्रोबिन 18.2 % + डायफेनोकोनॅझोल 11.4 % 200 मिली किंवा प्रोपिकोनॅझोल 25 % प्रवाही 200 मिली किंवा क्लोरोथॅलोनील 75% 500 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे स्टिकर सह फवारणी करावी. हळद पिकात कंदकूज रोगाच्या व्यवस्थापनासाठी, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत द्यावे. कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास खालीलपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची जमिनीतून आळवणी करावी. मॅन्कोझेब 75% 3 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50 % 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी व क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जमिनीतून आळवणी करावी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिन्यातून एकदा अळवणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल्या कंदावर कंदमाशीची मादी अंडी घालते. त्यामुळे उघडे पडलेले कंद वेळोवेळी मातीने झाकावेत व वेळेवर भरणी करावी. एकरी 2 ते 3 पसरट तोंडाची भांडी ठेवून प्रत्येक भांड्यात 200 ग्रॅम भरडलेले एरंडीचे बी व 1 ते 1.5 लिटर पाणी घ्यावे. 8 ते 10 दिवसांनी तयार होणाऱ्या विशिष्ट वासाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होऊन त्यात पडून मरतात.सध्या अनेक ठिकाणी हळद पिकामध्ये पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे. पालाशाच्या कमतरतेमध्ये जुन्या पानांच्या कडा पिवळसर होऊन नंतर तपकिरी व करपल्यासारख्या दिसतात. त्यामुळे अशा लक्षणांना केवळ करपा समजून बुरशीनाशकाची फवारणी करू नये.विद्यापीठाने केलेल्या शिफारसीनुसार खतांचा योग्य डोस द्यावा.पालाशाची कमतरता दिसून आल्यास सल्फेट ऑफ पोटॅश (0:0:50) 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.ग्रेड-II सूक्ष्म अन्नद्रव्ये घन स्वरूपासाठी 5 ग्रॅम किंवा द्रवरूपासाठी 5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.आवश्यकता असल्यास आणि पिकाची अवस्था विचारात घेऊन 8 ते 10 दिवसांच्या अंतराने फवारणी पुन्हा एकदा करावी.

मराठवाडयाच्या अनेक भागामध्ये कमी पाऊस झाल्यामूळे भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी रब्बी हंगामामध्ये ज्वारीसारखे पीक घेऊन कडबा उत्पादन करणे गरजेचे आहे. पाण्याच्या उपलब्धतेनूसार रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करून घ्यावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात (1 ते 15 ऑक्टोबर) करावी. पेरणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.

पाण्याच्या उपलब्धतेनूसार करडई पिकाची पेरणी करून घ्यावी. हमखास पावसाच्या भागात करडई पिकाची पेरणी 15 ऑक्टोबर पर्यंत करावी. करडई पिकाच्या पेरणीसाठी शारदा, परभणी कुसुम (परभणी-12), पूर्णा (परभणी-86), परभणी-40 (निम काटेरी), अन्नेगीरी-1, एकेएस-327, एसएसएफ-708,आयएसएफ-764 इत्यादी वाणांपैकी निवड करावी.

पाण्याच्या उपलब्धतेनूसार हरभरा पिकाची पेरणी करून घ्यावी. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. तर मूळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा 10  ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीची अवस्था असल्याने पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. झाडावर फळांची संख्या जास्त असल्यास योग्य प्रमाणात फळांची विरळणी करावी, त्यामुळे फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यास मदत व उत्पादन चांगले मिळण्यास मदत होईल. अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आल्यास 00:52:34 या विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

डाळींब बागेस आवश्यकतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. मृग बहार डाळींब बागेत अन्नद्रव्यांची कमतरता दिसून आल्यास 00:52:34 या विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत ठेवावे.

चारा पिके

चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात. भविष्यामध्ये पशुधनासाठी चारा टंचाई भासू शकते. यासाठी रब्बी हंगामामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनूसार रब्बी ज्वारी, बाजरी, मका व ओट पिकाची पेरणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

कुक्कुट पालनात पिण्यास स्वच्छ पाण्याची अहोरात्र व्यवस्था होईल याची काळजी घ्यावी. तापमानात वाढ झाल्यामूळे, जनावरांच्या गोठ्याच्या छतावर साळीचे गवत किंवा स्प्रींकलरची व्यवस्था करावी, जेणेकरून गोठयाच्या आतील तापमानात घट होईल. जनावरांना सावलीत किंवा गोठ्यामध्ये बांधावे. गोठ्यात मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी ठेवावे.

                                  सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 55/2026-2027    शुक्रवार, दिनांक – 09.10.2026

 

No comments:

Post a Comment