Friday, 29 October 2021

दिनांक 02 ते 07 नोव्हेंबर दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार  मराठवाडयातील नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात दिनांक 02 नोव्हेंबर रोजी तर दिनांक 02 ते 07 नोव्हेंबर दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 03 नोव्हेंबर ते 09 नोव्हेंबर, 2021 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

बागायती हरभरा पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टर द्यावे. हरभरा पिकास जस्त व गंधक या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते, म्हणून 20 किलो झिंक सल्फेट व 20 किलो गंधक प्रति हेक्टर द्यावे.गहू पिकाच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी सुपीक जमिन निवडावी. खोल नांगरट व वखराच्या दोन ते तीन पाळया देऊन काडी कचरा वेचून घ्यावा.पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. ऊस पिकाच्या लागवडीसाठी को-86032, को-94012, को-0265, कोव्हीएसआय-03102, कोव्हीएसआय-1805 व को-92005 या भरपूर फुटवे देणाऱ्या जातींची निवड करावी.हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

लिंबूवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रापरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी फळबागेत फळगळ होऊ नये म्हणून तसेच फळाचा आकार वाढण्यासाठी जिब्रॅलिक ॲसिड 50 मिली ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.डाळींब बागेत फळांचा आकार वाढण्यासाठी 00:00:50 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.नविन लागवड केलेल्या चिकू बागेत जमिनीत वापसा येताच अंतरमशागतीची कामे करून तणव्यवस्थापन करावे. 

भाजीपाला

पुर्नलागवडीस तयार असलेल्या रब्बी भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करून घ्यावी व पुर्नलागवड केल्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे.

 

 

फुलशेती

पुढील काळात दीपावली सणामुळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते त्यामूळे आवश्यकतेनूसार फुलांच्या तोडणीचे नियोजन करावे.

चारा पिके

रब्बी हंगामात ज्वारी, ओट, बरसीम, लसूण घास इत्यादी चारा पिकांची लागवड करावी.

तुती रेशीम उद्योग

यशस्वी कोष उत्पादनासाठी तुती पाने उत्पादनाचा मोठा 38% वाटा असून संगोपन गृहातील हवामान म्हणजे तापमान 22 ते 28 अंश सेल्सियस व आर्द्रता 80 ते 85% असणे आवश्यक आहे. दूसऱ्या व तिसऱ्या वर्षात 5X3X2 फुट अंतरावर किंवा 6X2X2 फुट केलेल्या लागवडीत तुट राहणार नाही याची काळजी घ्यावी. तुटीमध्ये तुतीचे बेणे लागवड करणे यशस्वी राहत नाही. म्हणून तुट भरून काढण्यासाठी लहान तुती रोपे लावावीत. तुती रेशीम किटकाचे आवडते खाद्य म्हणजे तुती होय. म्हणून तुती पानावर भुरी रोग (पांढरे डाग) आल्यास बूरशीनाशक कार्बेन्डेझीम 0.2% म्हणजे 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 5 ते 6 दिवसांनी किटकास पाने खाद्य म्हणून द्यावे.

सामुदायिक विज्ञान

दूधामधील कॅल्शियम हाडांसाठी तर प्रथिने हे स्नायूंच्या बळकटी करणाकरिता आवश्यक आहे. सकाळी दुध घेतल्यानंतर दिवसभर ताजे वाटते. दुधामध्ये झींक आणि विटामीन डी असल्यामूळे दुधास रोग प्रतिकार शक्ती वाढवीणारे अन्न असे समजले जाते.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक61/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक - 29.10.2021

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 19 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी,नांदेड व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मूसळधार पावसाची शक्यता आहे तर लातूर जिल्हयात वादळी वारासह मूसळधार पावसाची शक्यता आहे. दिनांक 20 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना, परभणी व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यात हलक्या पाऊसाची शक्यता आहे. दिनांक 21 ते 23 ऑगस्ट कालावधीत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पाऊसाची शक्यता आहे.

  हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अ...