Thursday 30 December 2021

मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील दोन ते तिन दिवस किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 जानेवारी 2022 ते 11 जानेवारी, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची, किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

तूरळक ठिकाणी पडत असलेल्या हलक्या पावसामूळे व औरंगाबाद व जालना जिल्हयात झालेल्या गारपीटीमूळे भिजलेला कापूस वाळल्यानंतरच त्याची वेचणी करावी व या कापसाची साठवणूक वेगळी करावी. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकास 180 दिवस झाले असल्यास कापसाची शेवटची वेचणी पूर्ण करून पालापाचोळा, पराट्या जमा करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. तूरळक ठिकाणी पडत असलेल्या हलक्या पावसामूळे व औरंगाबाद व जालना जिल्हयात झालेल्या गारपीटीमूळे भिजलेल्या तूर पिकाची  वाळल्यानंतरच कापणी व मळणी करावी. मळणी केलेले बियाणे उन्हात वाळवून साठवणूक करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत व 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम किंवा क्लोरॅंट्रानिलीप्रोल 18.5% 3 मिली किंवा फलुबेंडामाईड 20% 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे गहू पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी सायपरमेथ्रीन 10 ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ व दमट वातावरणामूळे करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब + कार्बेन्डाझीम संयूक्त बूरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे उशीरा लागवड केलेल्या हळद पिकावर पानावरील ठिपके रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे द्राक्ष बागेत डाऊनी मिल्डयूचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲमिसूलब्रुम 17.5 % एससी 0.375 मिली किंवा फ्युयोपिकोलाईड 4.44% + फोसेटिल एएल 66.67% संयूक्त बूरशीनाशक 2.5 ग्रॅम किंवा डायमिथोमॉर्फ 50% डब्ल्यूपी 0.50 ते 0.75 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ वातावरण, आर्द्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे मृग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल 10 मीली + स्टिकर प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  वादळी वारा, पाउस औरंगाबाद व जालना जिल्हयात झालेल्या गारपीटीमूळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर 1 % बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे फळबागेत (डाळिंब, संत्रा/मोसंबी, आंबा) रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून बागेत मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

सध्याच्या ढगाळ व दमट वातावरणामूळे भाजीपाला (कांदा, टोमॅटो, मिरची, वांगी इत्यादी) पिकावर ‍रोगव्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडी पासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळया, मेंढया तसेच कोंबडयाच्या शेडला बारदाण्याचे पडदे लावावे, त्यामूळे पहाटेच्या थंड वाऱ्यांपासून त्यांचे संरक्षण होईल. तसेच कोंबडयाच्या शेडमध्ये ईलेक्ट्रीक बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधत गोठ्यात बांधावे, तसेच त्यांना थंडीपासून संरक्षणासाठी कोरडी/उबदार जागेची व्यवस्था करावी. हिवाळयात जनावरांना उर्जेची गरज भागविण्यासाठी नियमितपणे जनावरांना खारटमिश्रणासह मिठ व गव्हाचे धान्य, गूळ इत्यादी 10 ते 20 टक्के प्रति दिवस द्यावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम कोषाच्या प्रत्येक पीकामध्ये 20 टक्के पर्यंत कोष उत्पादनात कीटकावरील येणाऱ्या रोगांमूळे घट येऊ शकते. रोगकारक जीवाणू, विषाणू किंवा बुरशीचा संगोपनगृहातून पूर्णपणे नायनाट होणे आणि संगोपन साहित्याचे नियमित निर्जंतूकीकरण होणे गरजेचे असते. त्यामूळे भींती किंवा शेडनेटवर 200 मिली प्रती चौरस मीटर या प्रमाणात ब्लिचींग पावडर 02 टक्के आणि 0.3 टक्के विरी गेलेला चूणा द्रावणासोबत फवारणी करावी व नंतर 24 तासांनी अस्त्र निर्जंतूक पावडर 50 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारलेले उर्वरीत पाणी रोगकारकासोबत नालीतून संगोपनगृहाबाहेर वाहून जाणे गरजेचे आहे. त्यामूळे चोहीबाजूने 22.5 सें.मी. X 15 सें.मी. आकाराची नाली असणे आवश्यक आहे.

सामुदायिक विज्ञान

वनामकृवि विकसित वांगी मोजा व भेंडी मोजा भाजी तोडणी कार्यातील शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयूक्त आहे.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक79/2021 - 2022      शुक्रवार, दिनांक – 31.12.2021

 

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...