Friday 29 July 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 29 जुलै रोजी नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे

 मराठवाडयात दिनांक 30 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 31 जुलै ते 02 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 29 जुलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी एवढा तर दिनांक 05 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 07 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिक पिवळे पडत असल्यास (क्लोरोसीस) याच्या व्यवस्थापनासाठी शेतात वापसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढण्याची व्यवस्था करावी व नंतर सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2 ची 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. पहिल्या फवारणीने पाने हिरवी न झाल्यास परत आठ दिवसांनी दूसरी फवारणी करावी. सोयाबीन पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन संशोधनालय इंदौर यांच्या शिफारसीनूसार  थायामिथॉक्झाम 25% 40 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारावे. सोयाबीन पिकामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या किंवा मिठाच्या पाण्यात बूडवून माराव्यात. गोगलगायींच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड दोन किलो प्रति एकर याप्रमाणात शेतात पसरून द्यावे. खरीप ज्वारी पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. खरीप ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. बाजरी पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. ऊस पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. सध्या ढगाळ वातावरणामूळे व रिमझीम पावसामूळे ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. हळद पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. सततच्या पावसामूळे हळद पिवळी पडत असल्यास पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर 2% यूरियाची फवारणी करावी. हळद पिकात पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर बायोमिक्सची आळवणी करावी. आळवणीसाठी 25 ते 50 लिटर पाण्यात 4 किलो (पावडर)/ 4 लिटर (लिक्वीड) बायोमिक्स याप्रमाणे द्रावण तयार करावे व ते ठिबक सिंचनाद्वारे पिकास सोडावे किंवा पंपाचा नोझल काढून 200 ग्रॅम (पावडर) / 200 मिली (लिक्वीड) प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी. पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर संत्रा/मोसंबी बागेत रोगनाशकाची आळवणी करावी, खोडाला बोर्डोपेस्ट लावावी, झाडांवर 19:19:19 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब बागेत वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी.पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर डाळिंब बागेत तेलकट डागाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट 90% + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10%) 0.5 ग्रॅम प्रति लिटर हे महिन्यातून एकदा आणि सात ते दहा दिवसाच्या अंतराने ब्रोनोपाल नंतर फवारावे. पाऊस झाल्यानंतर लगेचच स्ट्रेप्टोसायक्लीन + कॉपरजन्य बूरशीनाशकाची फवारणी करावी. सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे फुलकळीची गळ होऊ नये म्हणून बागेत 19:19:19 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  चिकू बागेत वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी.सध्या ढगाळ वातावरणामूळे काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. मिरची पिकावरील अँन्थ्रॅकनोज/डायबॅक रोगाच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड 50% डब्ल्यूपी किंवा मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून व जमिनीत वापसा आल्यानंतर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात वापसा स्थिती निर्माण होईल अशी व्यवस्था करावी.

तुती रेशीम उद्योग

निरनिराळया येणाऱ्या रोगामूळे रेशीम किटक मृत पावतात. चिन देशात रेशीम कोष पीकात फक्त 5 ते 6 % पर्यंत रोगामूळे कोष पिकाचे नुकसान होते तर भारतात 25 ते 30 % नुकसान होते. रोग येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी हाच रामबाण उपाय होय. संगोपनगृह व संगोपन साहित्याचे वेळोवेळी निर्जंतूकीकरण 2% ब्लिचिंग पावडर व 0.3% चुना, अस्त्र, सेरी स्वच्छ, क्लोरीनडाय ऑक्साईड, सॅनिटेक 2.5% इ. निर्जंतूके यांचा वापर करावे. प्रत्येक कात भरताना कीटकांवर पांढरा चुना धुरळणी करावी व कातेवरून उठण्याअगोदर अर्धा तास निर्जंतूक विजेता पावडर शिफारसी प्रमाणे धुरळणी करावी.

सामुदायिक विज्ञान

पारंपारिक पध्दतीने कपडे धुताना कपडे धुण्यासाठी लागणारे इतर साहित्य नजरेच्या व हाताच्या टप्प्यात असेल तर कपडे धुण्याचा वेळ वाचतो आणि डोळयांवर व शरिरावर येणारा ताण कमी होतो.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक35/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 29.07.2022

 

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...