Tuesday 16 August 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 16 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर दिनांक 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी तर दिनांक 20 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहील.

 सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग काही प्रमाणात वाढलेला आहे.  

मराठवाडयात दिनांक 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

मागील आठवडयात ढगाळ वातावरण असल्यामूळे कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा बूप्रोफेंझीन 25% 400 मिली प्रति एकर फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. तुर पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. मागील आठवडयात ढगाळ वातावरण असल्यामुळे मूग/उडीद पिकात मावा किडीचा प्रादर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5 % निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट 30 % 240 मिली प्रति एकर फवारणी करावी.  मागील आठवडयात ढगाळ वातावरण असल्यामूळे भूईमूग पिकात मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा ऑक्झीडीमेटॉन मिथाईल 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.  मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामिथोक्झाम 12.6 टक्के + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 झेडसी 5 मिली किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. केळी बागेत 50 ग्रॅम नत्र प्रति झाड खतमात्रा द्यावी. द्राक्ष बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. द्राक्ष बागेत पानांची विरळणी करावी व शेंडा खुडावा. द्राक्ष बागेत करपा आणि डाउनी मिल्ड्यू च्या नियंत्रणासाठी थायोफेनेट मिथाईल 1 ग्रॅम + मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. द्राक्ष  बागेत जिवाणूजन्य करपा नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सिताफळ बागेत आंतरमशागतीच कामे करून तण नियंत्रण करावे. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा व्हर्टिसीलीयम लॅकेनी जैविक बुरशी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळा ऋतूमध्ये अनेक वनस्पती सोबतच विषारी वनस्पती उदा. निळी फुली व माठ/काटेमाठ या देखील वाढतात. या वनस्पती पशुधनाच्या खाण्यामध्ये आल्यास विषबाधा होते. माठ/काटेमाठ खाण्यात आल्यास त्यातील नायट्रेटची विषबाधा होऊन श्वसन संस्थेवर परिणाम होऊन मृत्यू ओढवतो. निळीफुली ही वनस्पती खालल्यास किडणीवर परिणाम होतो म्हणून अशा वनस्पती खाण्यात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, व खाण्यामध्ये  आल्यास तात्काळ औषधोपचार करावा.

सामूदायीक विज्ञान

पावसाळयात पचनक्रिया मंदावल्याने अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही. यासाठी यासाठी पावसाळयात पचनास हलका, ताजा आणि गरम आहार घ्यावा.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक40 / 2022 - 2023      मंगळवार, दिनांक 16.08.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...