Friday 16 September 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 18 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात; दिनांक 19 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 20 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दि. 16 व 17 सप्टेंबर रोजी तूरळक ठिकाणी, दि. 18 व 19 सप्टेंबर रोजी काही ठिकाणी तर दि. 20 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 मराठवाडयात दिनांक 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा  तर दिनांक 23 ते 29 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 2:00 वाजता कृषि महाविद्यालय सभागृह, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे रब्बी शेतकरी मेळावा आयोजीत करण्यात येत आहे, तरी सर्व शेतकरी बंधूनी याचा लाभ घ्यावा.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझेक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 150 ते 200 ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3% + इपिक्साकोनाझोल 5% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80  मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारावे. खरीप ज्वारी पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा मॅलाथिऑन 5% भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे धुरळणी करावी किंवा मॅलाथिऑन 50% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे. तुर पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मराठवाडयात तिन दिवसानंतर पावसाची शक्यता असल्यामूळे काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगा वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी व फळगळ होऊ नये म्हणून 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. डाळींब बागेत रोगाच्या व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5%  किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बगेत फळवाढीसाठी 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

भाजीपाला

काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. टोमॅटो पिकावरील लवकर येणारा करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मिरची पिकावरील मर (ॲन्थ्रॅकनोझ) व्यवस्थापनासाठी क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

तुती रेशीम उद्योग

ढगाळ हवामानात पाऊस जास्त असेल तर तुती लागवडीत तण व गवत वाढते. उघाड पडताच वखराणे पाळी करावी व तण खुरपून घ्यावे. तणनाशकाचा वापर टाळावा. हराळी जास्त असेल तर कापून घ्यावी नंतर वखर पाळी करावी. हवेत आर्द्रता 85 टक्केच्या वर असेल तर भुरी रोग (पावडरी मिल्ड्यू) प्रादुर्भाव होतो. पानाच्या मागच्या बाजुस पांढरे डाग दिसतात. पाने कडक होऊन पिवळे पडतात. बाव्हेस्टीन (कार्बेन्डाझीम) बुरशिनाशक 500 ग्रॅम 250 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी व 5 दिवसांनी तुती पाने खाद्य म्हणून किटकांना घालतात.

पशुधन व्यवस्थापन

लम्पी स्कीन रोग याचा प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा या एक प्रमुख होय. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो. याच्या नियंत्रणासाठी सर्व साधारणपणे 1.पशुधनास प्रखर उन्हाच्या वेळेस चारावयास सोडू नये (सकाळी 10 ते 17 पर्यंत गोठयात ठेवावे) 2. शेणाचा उकिरडा/खड्डा शेण टाकल्यानंतर पॉलिथीन/ताडपत्रीने झाकून टाकावा.3. गोठयात स्वच्छता ठेवावी 4.पशुधनाच्या शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने 5% निम सिड कर्नल एक्सट्रक्ट (निम अर्क) (NSKE) अथवा वनस्पतीजन्य 10 मिली निम तेल + 10 मिली निलगीरी तेल + 10 मिली कारंज तेल + 2 ग्रॅम अंगाचा साबण + 1 लिटर पाणी हे द्रावण फवारावे.5. गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी गोळा करून शेकोटीमध्ये जाळावी. 6. आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. 7. रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पशुधनास लसीकरण करून घ्यावे.

 

सामुदायिक विज्ञान

बालकांची स्व-मदत कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना स्वत:च्याहाताने हाताने दूध पिणे, खाणे, भांग पाडणे, पावडर लावणे, स्वत:च्या कपडयांच्या गुंडया लावणे अशी कामे मोठयांच्या देखरेखीखाली करू द्यावी.

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक49/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक 16.09.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...