Friday 30 September 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 30 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

मराठवाडयात दिनांक 30 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा तर दिनांक 07 ते 13 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11 ऑक्टोबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेळेवर पेरणी केलेल्या व लवकर पकव होणाऱ्या सोयाबीनच्या जाती काढणीस तयार असल्यास स्वच्छ हवामानात पिकाची वेळेवर काढणी करावी. काढणी केलेले सोयाबीन पिक वाळल्यानंतर मळणी करावी किंवा ढिग करून झाकून ठेवावे. उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी पिकावरील कणसातील अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा मॅलाथिऑन 5% भुकटी प्रति हेक्टरी 20 किलो प्रमाणे धुरळणी करावी किंवा मॅलाथिऑन 50% 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकावर पायरीला (पाकोळी) याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्क किंवा र्व्हीटीसीलीयम लिकॅनी किंवा मेटारायझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. रासायनिक व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). हळदीच्या पानावरील ‍ठिपके याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% 10 मिली + 5 मिली स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जेथे शक्य आहे तेथे हरभरा पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाडयात करावी. जेथे शक्य आहे तेथे करडई पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे करून घ्यावी. हमखास पावसाच्या भागात करडई पिकाची पेरणी 15 ऑक्टोबर पर्यंत करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 1 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 2 मिली किंवा विद्राव्‍य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्‍यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. संत्रा/मोसंबी बागेत अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत असल्यास चिलेटेड झिंक 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत रोगाच्या व्यवस्थापनासाठी बोर्डो मिश्रण 0.5%  किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यूपी 2.5 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर हायड्रॉक्साईड 53.8% 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर + स्प्रेडर स्टिकर 0.3 ते 0.5 मिली प्रति लिटर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बगेत फळवाढीसाठी 00:52:34 1500 ग्रॅम व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे पावसाची उघाड बघून फवारणी घ्यावी. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

 

भाजीपाला

भाजीपाला पिकात आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. रब्बी हंगामाकरिता लागणाऱ्या भाजीपाला पिकांच्या बियाण्याची गादी वाफ्यावर पेरणी केली नसल्यास पेरणी लवकरात लवकर करावी.

चारा पिके

चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत नेपियर पिकाची  पहिली कापणी 65 ते 70 दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.

फुलशेती

नवरात्री उत्सवामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी आहे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी लवकरात लवकर करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी.  

तुती रेशीम उद्योग

रेशीम कोषाचा बाजारातील भाव कोषातील रेशीम धागा टक्केवारीवर अवलंबून असतो. तेव्हा ए ग्रेड कोष उत्पादन करण्यासाठी तुतीच्या पानाची प्रत उत्तम असावी लागते. त्यासाठी विषमूक्त व सेंद्रीय खत देणे गरजेचे आहे. एक किलो कोष होण्यासाठी कमीत कमी कोषाची संख्या हवी. साधारणपणे 550 ते 600 कोष एक किलोत बसले तर ए ग्रेड, 600 ते 700 कोष बसले तर बी ग्रेड, 700 ते 800 कोष बसले तर सी ग्रेड व 800 च्या वर बसले तर डी ग्रेड. एक कि.ग्रॅ. रेशीम धागा तयार होण्यासाठी लागणार कोष संख्या (किलो) त्यास रिनडाटा असे म्हणतात. मागील दशकात 8.5 किलो कोष वरून सध्या 6.5 किलो पर्यंत रीनडाटा ने मजल मारली आहे.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन डीसीज होत आहे. यांचा प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण : किटकवर्गीय माशा : यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत करतात. हिमॅटोबीया ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते. अ) शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व शेणाचा  खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे. ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे. टॅबॅनस ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते. अ) पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व गोठयात ठेवावे. स्टोमोक्सीस या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती आपली अंडी घालतात. अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी. ब) या माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा सोडून पशुधनास चरावयास सोडावे.

सामुदायिक विज्ञान

बालकांना त्यांच्या वयास व विकासात्मक पातळीस अनुसरून मनोरंजकरित्या गोष्टी सांगाव्या, कारण गोष्टी ऐकल्यामूळे त्यांचा शब्दसंग्रह, सामान्यज्ञान, जिज्ञासा, बौध्दीक, कल्पनाशक्ती व स्मरणशक्ती वृध्दिंगत होते. याबरोबरच त्यांचा वाचा व भाषा भावनात्मक, सामाजिक व नैतिक विकास साधण्यासाठी गोष्टी लाभदायी ठरतात.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक53/2022 - 2023      शुक्रवार, दिनांक – 30.09.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...