Tuesday 18 October 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 18 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तर दिनांक 19 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 19 व 20 ऑक्टोबर रोजी तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम तर दिनांक 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


मराठवाडयात दिनांक 21 ते 27 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 23 ते 29 ऑक्टोबर, 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे तर किमान तापमान सरासरीएवढे तर पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

 

पीक व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी कापूस पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. कापूस पिकात दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली किंवा क्रेसोक्सिम-मिथाइल 44.3% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा फलोनिकॅमिड 50% 60 ग्रॅम किंवा डायनेटोफ्यूरॉन 20% 60 ग्रॅम किंवा पायरीप्रॉक्झीफेन 5% +डायफेन्थुरॉन 25% (पूर्व मिश्रित किटकनाशक) 400 ग्रॅम प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. प्रादूर्भाव जास्त आढळून आल्या प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 88 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली  किंवा थायोडीकार्ब 75% 400 ग्रॅम प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारावे. कापूस पिकात लाल्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 20 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. पाऊस झालेल्या ठिकाणी काढणी न केलेल्या सोयाबीन पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेले सोयाबीन पिक गोळा करून शेडमध्ये किंवा ढिग करून ताडपत्रीने/पॉलिथीनने झाकून ठेवावे. काढणी केलेले सोयाबीन पिक पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी. पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर करावयाचा असल्यास सोयाबीनची मळणी 350 ते 400 आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशींपासून बियाण्याचे संरक्षण होईल. पाऊस झालेल्या ठिकाणी तुर पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तुर पिकात फायटोप्थोरा ब्लाईट प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी वापसा येताच लवकरात लवकर ट्रायकोडर्मा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून खोडाभोवती आळवणी व खोडावर पावसाची उघाड बघून फवारणी करावी.  तूर पिकावरील पाने गुंडाळणारी अळीच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा क्विनॉलफॉस 25% 16 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.   काढणीस तयार असलेल्या खरीप भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मका पिकाची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करता येते. पेरणी 60X30 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. रब्बी ज्वारी पिकाची पेरणी जमिनीत वापसा असल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. रब्बी सुर्यफुलाची पेरणी जमिनीत वापसा असल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. पेरणी संकरीत वाणासाठी 60X30 सेंमी तर सुधारित वाणासाठी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 8 ते 10 किलो बियाणे वापरावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

पाऊस झालेल्या ठिकाणी केळी बागेत साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. केळी फळ पिकावरील करपा (सिगाटोका) रोगाच्या व्यवस्थापनासाठी मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. जमिनीत वापसा येताच केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.  पाऊस झालेल्या ठिकाणी द्राक्ष बागेत साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करणऱ्या शेतकऱ्यांनी ऑक्टोबर छाटणीचे नियोजन करावे. काढणीस तयार असलेल्या सिताफळाची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत पाठवावी.

भाजीपाला

पाऊस झालेल्या ठिकाणी भाजीपाला पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. टोमॅटो पिकावरील करपा याच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काकडीवर्गीय भाजीपाला पिकात डाउनी मिल्ड्यू चा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी अझोऑक्सीस्ट्रोबिन 23% एससी 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यस्थापनासाठी लिकॅनीसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) 40 मिली किंवा पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. जमिनीत वापसा येताच भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.

फुलशेती

पाऊस झालेल्या ठिकाणी फुल पिकात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. पुढील आठवडयात येणाऱ्या दिवाळी सणामूळे बाजारपेठेत फुलांना अधिक मागणी असते त्यानुसार टप्प्याटप्प्याने बागेतील फुलांच्या तोडणीचे नियोजन करावे.

पशुधन व्यवस्थापन

अनेक मार्गाने लम्पी स्कीन डिसीजच्या विषाणूचा प्रसार होतो. त्यापैकी एक म्हणजे चावा घेऊन रक्त शोषण करणाऱ्या किटकवर्गी माशा व गोचीडे होत, परंतू काही शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार घरगूती माशा (चावा न घेणाऱ्या) देखील या विषाणूचा प्रसार करून शकतात. यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (1) गोठ्यामध्ये पडणारी रोगी पशुची लाळ, नाकातील स्त्राव यांचे व एकंदरीत गोठयाचे निर्जंतमकीकरण दैनंदिन करणे या निर्जंतूकिकरणासाठी खालील द्रावण वापरावीत. (अ) 1 टक्के फॉरमेलीन द्रावण अथवा(ब) 2 टक्के सोडीयम हायपोक्लोराईट द्रावण अथवा (क) 3 टक्के फेनाल/फिनाईल द्रावण या तीन पैकी एक द्रावण गोठयात फवारावे. हे द्रावण पशुच्या शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच फवारणी नंतर अर्धातास पशुधनास गोठयामध्ये जाऊ देवू नये. (2)गोठयामध्ये व परिसरामध्ये निर्जंतूकीकरणासोबतच ठरावी कालांतराने वनस्पतीजन्य/रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे उच्चतम दर्जाची गोठयाची स्वच्छता राखावी. 

सामूदायीक विज्ञान

पीक कापणी आणि मळणी करतांना शेतकऱ्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते जसेकी, हाताला कापणे, जखमा होणे, हाताला अथवा शरीराच्या इतर अवयवांना खाज येणे, खोकला, नाक गळणे, श्वासासंबंधित तक्रारी, उन लागणे, इत्यादी पीक कापणी आणि मळणी करतांना सुरक्षात्मक वस्त्रांचा संच ज्यामध्ये लांब बाहीचा टोपीसह सदरा, हातमोजे, पायमोजे, चष्मा, कापडी अवगुंठन आणि बुट इत्यादींचा वापर करावा.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक58/ 2022 - 2023      मंगळवार, दिनांक – 18.10.2022

 

No comments:

Post a Comment

दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर जिल्हयात व दिनांक 15 मे रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. दिनांक 14 मे रोजी लातूर, धाराशिव, जालना व परभणी जिल्हयात तर दिनांक 15 मे बीड, धाराशिव व जालना जिल्हयात तर दिनांक 16 मे रोजी धाराशिव, लातूर, बीड जिल्हयात व दिनांक 17 मे रोजी धाराशिव, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 14 मे रोजी बीड व छत्रपती संभाजी नगर ज...