Thursday 10 November 2022

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील तिन दिवसात किमान तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे त्यानंतर किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

 

मराठवाडयात दिनांक 11  ते 17 नोव्हेंबर व दिनांक 18 ते 24 नोव्हेंबर दरम्यान किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरी पेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 नोव्हेंबर, 2022 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान व पाऊस सरासरीएवढा राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

बागायती हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45X10 सेंमी अंतरावर करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश (109 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश + 12 किलो युरिया किंवा 54.25 किलो युरिया + 313 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.  बागायती करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर संपवावी. पेरणी 45X20 सेंमी अंतरावर करावी. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व  30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे (पेरणीच्या वेळी 87 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 31 किलो युरिया किंवा 65 किलो युरिया + 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पेरणीच्या वेळी द्यावे व पेरणी नंतर एक महीन्यानी 65 किलो युरिया द्यावा).   हळदीवरील पानावरील ठिपके आणि करपा यांच्या व्यवस्थापनासाठी ॲझोऑक्सीस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% एससी 10 मिली  किंवा बायोमिक्स 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह फवारणी करावी. हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी बायोमिक्स 150 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. हळदीवरील कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15  मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून चांगल्या दर्जाचे स्टिकरसह आलटून-पालटून फवारणी करावी.  उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).  पूर्व हंगामी ऊसाची लागवड 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. ऊस लागवड करतांना 30 किलो नत्र, 85 किलो स्फुरद व 85 किलो पालाश (327 किलो 10:26:26  किंवा 185 किलो डायअमोनियम फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश  किंवा 65 किलो युरिया + 531 किलो सिंगल सुपर फॉस्फेट + 142 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 10 मिली किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8% 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डाळींब बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. डाळींब बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. बागेतील पडलेली फळे गोळा करून व रोग ग्रस्त फांद्या काढून नष्ट कराव्यात. डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी.

भाजीपाला

पुर्नलागवडीसाठी तयार असलेल्या (टोमॅटो, कांदा, कोबी इत्यादी) भाजीपाला पिकांची पुर्नलागवड करावी तसेच गाजर, मेथी, पालक इत्यादी पिकांची लागवड करावी. पुर्नलागवड केलेल्या भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. मिरची पिकावर सध्या फुलकिडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे याच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामिप्रिड 20 % एस.पी. 100 ग्रॅम किंवा सायअँन्ट्रानिलीप्रोल 10.26 ओ.डी. 600 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एस. जी. 200 ग्रॅम प्रति हेक्टर फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करून पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करावी.

तुती रेशीम उद्योग

उझी माशी रेशीम किटकावर उपजिविका करणार परोपजिवी कीड आहे. या कीडीच्या प्रादूर्भावामुळे 20 टक्क्यापर्यंत कोष पीकाचे नुकसान होते. अंडी, अळी, कोष व प्रौढ माशी अशा चार अवस्थेचा जिवन क्रम असून एकात्मीक पध्दतीने नियंत्रण उपाय करावेत. कच्या शेडनेट संगोपनगृहात उझी माशी सरळ प्रवेश करणार नाही यासाठी तुती पाने/ फांद्या छाटणी नंतर अंधार खोलीत अर्धा ते एक तास साठवून नंतर संगोपनगृहात न्यावा व खाद्य द्यावे. शेडनेटच्या जाळीच्या वरच्या बाजूस छिद्र राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. जमीनीवर फरशी करावी. चौथी कात टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी लिसोलायनेक्स थायमंस परोपजिवी कीटकाचे दोन पाउच प्रति शंभर अंडीपुज या प्रमाणात रॅकवर चंद्रिके जवळ ठेवावेत, कोष काढणी नंतर खताच्या खड्डयाजवळ ठेवावेत.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन रोग चालू आहे. त्यातच चार महिण्याखालील वासरांमध्ये जास्तीचा प्रादूर्भाव आढळत आहे, म्हणून वासरांचे आरोग्य अबाधीत राहून त्यांना लम्पी रोगाशी सामना करता यावा यासाठी त्यांना 1. सात दिवस व त्यापुढील वासरांना जंतनाशकाची प्रथम मात्रा त्वरीत द्यावी. 2. ज्या वासरांनी चरावयास सुरूवात केली आहे, माती चाटत आहेत अथवा आवमिश्रीत रक्ती हगवण आहे अशा सर्व वासरांना तात्काळ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली कॉक्सीडीओसीस (रक्ती हगवण) रोधक औषधीची मात्रा देउन घ्यावी.

सामुदायिक विज्ञान

जड कामे करतांना दोन्ही हातांचा एकत्रित वापर करावा. जेणेकरून कामाचा थकवा कमी जाणवतो.

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक65/2022 - 2023     शुक्रवार, दिनांक – 11.11.2022

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...