Friday 30 June 2023

मराठवाडयात दिनांक 30 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्हयात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्हयात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, दिनांक 01 ते 4 जूलै दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.

मराठवाडयात दिनांक 30 जून रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्हयात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्हयात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, दिनांक 01 ते 4 जूलै दरम्यान मराठवाडयात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 30 जून ते 06 जूलै 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व दिनांक 07 ते 13 जूलै दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 05 ते 11 जूलै 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात जमिनीतील ओलावा वाढलेला आहे.

सध्या पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामूळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. मान्सूनचा पेरणीयोग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्यानंतरच खरीप पिकांची बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. सर्वसाधारणपणे 15 जूलै पर्यंत सर्व खरीप पिकांची (मूग, उडीद, भुईमूग सोडून) पेरणी करता येते.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी कार्बोक्झिन 37.5 % + थायरम 37.5 % (मिश्र घटक) या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम किंवा ॲझोक्सीस्ट्रोबीन 2.5 टक्के + थायोफॅनेट मिथाईल 11.25 टक्के + थायोमिथॉक्झाम 25 टक्के एफ एस 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या बिजप्रक्रियेनंतर थायामिथोक्झाम 30% एफएस 10 मिली प्रति किलो ग्रॅमची बिजप्रक्रिया करावी. वरील बिजप्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत ( ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची (पी.एस.बी.) 250 ग्रॅम प्रति 10 किलो किंवा 100 मिली/10 किलो ग्रॅम (द्रवरूप असेल तर) याची बिजप्रक्रिया करावी व नंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून शक्य तेवढ्या लवकर पेरणी करावी. बिजप्रक्रियेसाठी व.ना.म.कृ. वि. परभणी निर्मित द्रवरूप जैविक खताचा (रायझोफॉस) 10 मिली प्रति किलो बियाणे याप्रमाणात वापर करता येतो. सोयाबीनची पेरणी 15 जुलै पर्यंत करता येते. सोयाबीन पिकाची पेरणी शक्यतो बी.बी.एफ (रूंद वरंबा सरी) पध्दतीने करावी ज्यामूळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपिकता टिकून राहण्यास मदत होऊन अधिक उत्पादन मिळते. खरीप ज्वारीच्या पेरणीपूर्वी गंधक 300 मेश 4 ग्रॅम किंवा थायरम 75 टक्के 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. तसेच इमिडाक्लोप्रीड 48 टक्के एफएस 14 मिली किंवा थायमिथॉक्झाम 30 टक्के 10 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पी.एस.बी) प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी.  खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. बाजरी पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास मेटालॅक्झील 35 % एसडी 6 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. 250 ग्रॅम ॲझोस्पिरीलम 10 किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी किंवा शेवटी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणात बियाण्यावर बिजप्रक्रिया करून पेरणी करता येते. सुरू ऊसाची पक्की बांधणी केली नसल्यास ती करून घ्यावी व नत्र खताचा चौथा हप्ता द्यावा. हळद लागवडीपूर्वी बियाण्यास क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मिली + कार्बेंडेझीम 50 टक्के 10 ग्रॅम किंवा डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली + डायथेन एम-45 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 100-120 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.बियाणे 10 ते 15 मिनिट द्रावणात बूडवून ठेवावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नवीन संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी.

 

चारा पीके

मका या चारापिकाच्या लागवडीसाठी आफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगासफेद, विजय इत्यादी जातींची निवड करावी.

भाजीपाला

भाजीपाल्याचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

पावसाळयामध्ये शक्यतो शेळ्या मेंढ्यांना उघडयावर ठेवण्याऐवजी शेडमध्ये बांधावे त्यामूळे त्यांना पावसाचा मार बसणार नाही आणि त्यांचे शरीर तापमान कमी होणार नाही. भिजल्यामुळे शेळ्या-मेंढ्यांना फुफ्फूसाचा दाह  होण्याची शक्यता असते (थंड पाण्याच्या मारामूळे) तसेच दलदल जमीनीमूळे खूर सडण्याची समस्या उद्भवणार नाही. 

तुती रेशीम उद्योग

रेशीम किटक वाढीच्या 5 अवस्था असून 4 कात अवस्था असतात. पहिल्या दोन अवस्था 7 ते 8 दिवसाच्या असून त्यांना बाल्य रेशीम किटक (चॉकी वर्मस) असे म्हणतात. पहिल्या दोन अवस्थांना कोवळी तुतीची पाने व्हि-‍1 किंवा एस-36/जी-2 वाणाची अवश्यकता असते. साधरणत: पहिल्या दोन अवस्थेसाठी 100 अंडिपूजास 22 कि.ग्रॅ. तुती पाने बतईच्या साहाय्याने 0.5 ते 1.0 चौ.सेंमी. आकाराचे करून खाद्य दिवसातून 3 ते 4 वेळा द्यावे. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या वाढीच्या अवस्थेत तुती फांद्या खाद्य देता येईल. प्रोढ अवस्थेत 8 ते 9 क्विंटल तुती पाने आणि दुप्पट फांद्या खाद्य द्यावे लागते.

सामुदायिक विज्ञान

रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी रोजच्या जेवणातील पदार्थांमध्ये विविध पानांची (पावडर) भुकटीचा उपयोग करता येतो. जसे, कढीपत्यांची पाने, कोबीची पाने,  राजगिऱ्याची पाने, शेवग्याची पाने, हरबऱ्याची पाने आणि बिटाची पाने इत्यादी.

ईतर

शंखी गोगलगायीच्या व्यवस्थापनासाठी  पाऊस पडल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिक रित्या मोहिम राबवून गोगलगायी गोळा करून प्लास्टीकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मिठ अथवा चूना टाकून नष्ट कराव्यात.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक24/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 23.06.2023

 

No comments:

Post a Comment