Friday 11 August 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील पाच दिवसात तूरळक ठिकाणी खूप हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 11 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व दिनांक 18 ते 24 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 16 ते 22 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा दर वाढलेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

उशीरा पेरणी केलेल्या सोयाबीन पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. सोयाबीन पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक प्रसारासाठी कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लिकॅनी सिलीयम लिकॅनी या जैविक बूरशीयूक्त किटकनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून हवेत आर्द्रता व जमिनीत ओल असतांना फवारणी करावी तसेच रासायनिक नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम 12.6% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6% झेड सी 50 मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड 25% + बाइफेन्थ्रीन 25% डब्ल्यू जी 100 ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% ओडी 140 मिली यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणे  करावी. पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकर 10 पिवळे चिकट सापळे लावावेत. सोयाबीन पिकावरील किडींच्या व्यवस्थापनासाठी क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर किंवा थायामिथोक्झाम 12.6% + लँबडा सायहॅलोथ्रिन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली प्रति एकर किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 9.3% + लँबडा सायहॅलोथ्रिन 4.6% 80  मिली प्रति एकर (पूर्वमिश्रित किटकनाशक) किंवा टेट्रानिलीप्रोल 18.18% 100 ते 120 मिली प्रति एकर किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन 8.49% + इमिडाक्लोप्रीड 19.81% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 140 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक फवारावे. सध्या पावसाने उघडीप दिल्यामूळे सोयाबीन पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास 1% (100 ग्रॅम प्रति 10 लिटर) पोटॅशियम नायट्रेटची (13:00:45) फवारणी करावी. उशीरा पेरणी केलेल्या खरीप ज्वारी, बाजरी व हळद पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. खरीप ज्वारी, बाजरी, ऊस व हळद पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून  फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून  फवारणी करावी. वेळेवर लागवड केलेल्या हळद पिकात लागवडीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी पिक तीन ते पाच पानांवर असतांना पिकात भरणी करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत हलकी कोळपणी करावी जेणेकरून बागेतील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. संत्रा/मोसंबी, डाळींब व चिकू बागेत पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार ठिबक सिंचन पध्दतीने पाणी द्यावे.  लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 20 मिली किंवा प्रोपरगाईट 20 ईसी 10 मिली किंवा इथिऑन 20 ईसी 20 मिली किंवा अबामेक्टिन 1.9 ईसी 3.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 20 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 30 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्‍यात मिसळून  फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. अंबे बहार धरलेल्या मोसंबी फळबागेत फळगळ थांबविण्यासाठी 100 लिटर पाण्यात एक किलो यूरिया + 30 मिली प्लॅनोफिक्स द्रावणाची फवारणी करावी.

 

भाजीपाला

भाजीपाला पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी)  पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती

नविन लागवड केलेल्या फुल पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. फुल पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार सूक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

चारा पिके

उशीरा पेरणी केलेल्या चारा पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. चारा पिकात पाण्याचा ताण बसत असल्यास उपलब्धतेनूसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग

कोष काढणी नंतर प्लास्टीकच्या चंद्रिला (नेत्रिका) वरील कोषाचा उर्वरीत धागा (वेस्ट) काढून टाकण्यासाठी भौतीकिय पध्दत म्हणजे ज्योत (फ्लेमगन) चा वापर करणे किंवा छोटा पितळी स्टो (केरोसीन) चा वापर करणे सोईचे ठरते. कमी वेळात निर्जंतूकिकरण होते पण काळजीने काहि केले तर प्लास्टीक चंद्रिला जळतात तुटतात. दुसरा सोपा पर्याय म्हणजे 0.3 टक्के ब्लिचिंग पावडर आणि 2 टक्के चुना द्रावण 200 लिटर टाकीत पाण्यात तयार त्या चंद्रिला अर्धातास ठेवणे. सर्व धागा विरघळून जातो, त्यामूळे पुढील रोग प्रसार टळतो. काढलेले कोष स्वच्छ करावेत. डबल कोष, पोचट कोष डागाळलेले कोष त्रिकोणी कोष किंवा दबलेले कोष वेगळे करावेत. कोषासोबत मिसळू नयेत. सर्व कोषात मिसळले तर भाव कमी लागतो.

पशुधन व्यवस्थापन

गोवंशीय पशुधनामध्ये सध्या लम्पी स्कीन डीसीज होत आहे. यांचा प्रसार अनेक मार्गापैकी एक म्हणजे किटकवर्गीय चावणाऱ्या माशांमार्फत होतो. त्या किटकवर्गीय माशा व त्यांचे नियंत्रण : किटकवर्गीय माशा : यामध्ये सर्वात जास्त हिमॅटोबीया प्रजातीची माशी, त्यानंतर टॅबॅनस, स्टोमोक्षीस, क्यूलिफॉईडस आणि डास, या सर्व प्रजातीच्या माशा रक्त शोषण करतात व लम्पी स्कीन डिसीजचे विषाणू यांत्रीक पध्दतीने प्रसारीत करतात. हिमॅटोबीया ही माशी पशुधनास अठ्ठेचाळीस वेळेस चावे व टाकलेल्या ताज्या शेणावरती अंडी घालते. अ) शेणाची योग्य विल्हेवाट लावणे व शेणाचा  खड्डा पॉलीथीन/ताडपत्रीने आच्छादित करणे. ब) पशुधनाच्या शरीरावर वनस्पतीजन्य अथवा रासायनिक किटकनाशकाच्या द्रावणाची फवारणी करणे. टॅबॅनस ही माशी आकाराने मोठी असून गाय/म्हैस यांना प्रखर सुर्यप्रकाशामध्ये चावा घेते व त्याजागी रक्त वाहते. अ) पशुधनास प्रखर सुर्यप्रकाशामध्ये (सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत) चरावयास सोडू नये व गोठयात ठेवावे. स्टोमोक्सीस या प्रजातीच्या माशा मुत्राने माखलेल्या वैरणीवरती आपली अंडी घालतात. अ) गोठयातील अर्वरीत वैरण शेणाच्या खड्डयामध्ये टाकावी. ब) या माशा देखील प्रखर सुर्यप्रकाश असताना चावतात म्हणून प्रखर सुर्यप्रकाशाच्या वेळा सोडून पशुधनास चरावयास सोडावे.

सामुदायिक विज्ञान

भेंडी व वांगी तोडणी जरी सोपी वाटत असली तरी हे काम अतिशय कठीण आहे. भेंडीवर असणारी बारीक लव हातांना खाज आणते. भेंडी तोडल्यानंतर देठामधून निघणारा चिकट द्रव यामुळे भेंडी बोटामधून निसटते व भेंडी तोडणे अवघड होते. भेंडी आणि बोटांचे सतत घर्षण झाल्यामूळे बोटे रक्ताळतात आणि बोटांची आग होते, तर वांगी तोडतांना बोटांमध्ये काटे घुसतात. यावर उपाय म्हणून शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढवण्यासाठी जनाई मोजाचा वापर करावा.

 

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक38/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक – 11.08.2023

 

 

 

No comments:

Post a Comment