प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 12 व 13 सप्टेंबर रोजी
तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची, दिनांक 14 सप्टेंबर रोजी औरंगाबाद,
नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्हयात काही ठिकाणी, दिनांक 15 सप्टेंबर रोजी
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी, दिनांक 16 सप्टेंबर रोजी परभणी,
लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हयात बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,
वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्ये स्वरूपाच्या पावसाची
शक्यता आहे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर
दिनांक 16 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, हिंगोली व नांदेड जिल्हयात बहुतांश ठिकाणी
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.)
राहून मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल
तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात
दिनांक 15 ते 21 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाड्यात दिनांक 17
ते 23 सप्टेंबर 2023
दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान सरासरीएवढे
राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा
वेग कमी झालेला आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
कापूस पिकाची उंची पाच फुट
झाल्यास शेंडा खुडावा किंवा कापूस पिकाची वाढ थांबवण्यासाठी सायकोसिल या
वाढरोधकाची 2 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. मागील काही दिवसात झालेला पाऊस व
ढगाळ वातावरणामूळे, कापूस पिकात फुलकीडे यांचा प्रादूर्भाव वाढला आहे याच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली प्रति 10 लिटर
पाणी किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) एक किलो ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7% 168 मिली किंवा फिप्रोनिल 5% 600 मिली प्रति एकर पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी 5 गुलाबी
बोंडअळीसाठीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पिकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात.
प्रादूर्भाव जास्त आढळून आल्यास प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इमामेक्टीन
बेन्झोएट 5% 88 ग्रॅम
किंवा प्रोफेनोफॉस 40% + सायपरमेथ्रीन 4% 400 मिली (पूर्वमिश्रीत किटकनाशक) प्रति एकर आलटून पालटून पावसाची उघाड बघून
फवारावे. तूर
पिक 55 ते 60 दिवसाचे झाले असल्यास तूरीचे शेंडे खुडावे यामूळे तूर पिकाला जास्तीत
जास्त फांद्या फुटतात. मागील काही
दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, तुर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या
व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 30 मिली किंवा क्विनॉलफॉस
25% 20 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद
पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. काढणी केलेल्या शेंगाची सुरक्षित ठिकाणी
साठवणूक करावी. शेंगा पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. मागील
काही दिवसात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे, भूईमूग पिकात
मावा, फुलकिडे याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8 एस एल 2 मिली किंवा
क्विनॉलफॉस 25 ईसी 20 मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 5 ईसी 6 मिली प्रति 10 लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या भुईमूग
पिकात अऱ्या सुटण्याच्या अवस्थेत शक्य असल्यास भुईमूगाच्या पिकावरून रिकामे
ड्रम फिरवावे. त्यामूळे अऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होऊन शेंगाची संख्या वाढते
परिणामी उत्पादनात वाढ होते. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के
80 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 80 मिली प्रति एकर वरील किटकनाशकांची
आलटून पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक
पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
काढणीस तयार असलेल्या केळी
घडांची काढणी करून घ्यावी. केळी बागेत प्रति झाड 50 ग्रॅम नत्राची खतमात्रा
द्यावी. द्राक्ष बागेत नविन फुटणाऱ्या
फुटव्यांवर भूरी व करपा या रोगाचा प्रादूर्भाव दिसू शकतो, त्यामूळे अतिरिक्त
असलेल्या फुटी काढून टाकाव्यात व आवश्यक फुटी तारांवर व्यवस्थित बांधून घ्याव्यात.
त्यामूळे आर्द्रता कमी होऊन वेलींमध्ये हवा खेळती राहील. सिताफळ बागेत पिठया ढेकून किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास निंबोळी तेल 50 मिली किंवा लिकॅनिसिलीयम लिकॅनी 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची
उघाड बघून फवारणी करावी.
भाजीपाला
मागील काही दिवसात झालेला पाऊस व
ढगाळ वातावरणामूळे, भेंडी व काकडी वर्गीय पिकावरील भुरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी
मायक्लोब्युटॅनील 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (
मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण
करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी
पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन
15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
फुलशेती
काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची
काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह
मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असल्यामूळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू
नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे
व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. गोवंशीय पशुधनामध्ये लम्पी स्कीन
रोगाचा प्रादूर्भाव अत्यंत वेगाने होत आहे. याची सर्वात जास्त झळ लहान वयातील
वासरांना जाणवत असून मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी नियंत्रणासाठी व त्यांची
शारिरीक प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी 1) वासरांना चिक पाजावा. 2) वयाच्या सातव्या
दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा द्यावी. 3) महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शक
तत्वानूसार लसीकरण करून घ्यावे. 4)आजारी आणि निरोगी वासरे, गोधन स्वतंत्र पणे
विलगीकरण करावे. 5) सर्वात महत्वाचे म्हणजे 20% सूश्रूषा व 80% काळजी (ज्यामध्ये पाणी, सकस चारा, जखमांची सुश्रुषा
ईत्यादी) गोष्टी कराव्यात. 6) “माझे पशुधन माझी जबाबदारी” या सुत्रानूसार आपल्या
गोवंशीय पशुधनाची या कालावधीमध्ये जास्तीत जास्त काळजी घ्यावी.
सामुदायिक विज्ञान
बालकांची स्व-मदत कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना स्वत:च्या हाताने हाताने दूध पिणे, खाणे, भांग पाडणे, पावडर लावणे, स्वत:च्या
कपडयांच्या गुंडया लावणे अशी कामे मोठयांच्या देखरेखी खाली करू द्यावी.
ईतर
पिकात हूमणीच्या अळ्या दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
मेटाराईझीयम ॲनोसोप्ली या जैविक बूरशीचा 4 किलो (जास्त
प्रादुर्भाव असल्यास 10 किलो) प्रति
एकर जमिनीतून वापर करावा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम
सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 47/ 2023 - 2024 मंगळवार, दिनांक – 12.09.2023
No comments:
Post a Comment