Monday, 4 December 2023

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 05 ते 07 डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 05 ते 07 डिसेंबर दरम्यान आकाश ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील तीन दिवसात किमान तापमानात किंचित वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात 2 ते 3 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 08 ते 14 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 10  ते 16 डिसेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलावा  किंचित वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी लवकरात लवकर करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पाऊस झालेल्या ठिकाणी भिजलेल्या कापसाची वेचणी कापूस वाळल्यानंतर करावी व वेचणी केलेला कापूस वेगळा साठवावा. मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे कापूस पिकात बोंड सड दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. कापूस पिकात गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 6 मिली किंवा सायपरमेथ्रीन 25 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे उशीरा पेरणी केलेल्या तूर पिकात फुलगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी एन.ए.ए 4 मिली + 1‍0 मिली बोरॉन प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तूर पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम + मेटॅलॅक्झील + मॅनकोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे हरभरा पिकात मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी करावी किंवा आळवणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल 70 डब्ल्यूपी 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकातील घाटेअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात प्रति एकरी 02 कामगंध सापळे व 10 पक्षी थांबे उभारावेत. रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.4 ग्रॅम किंवा फ्लुबेंडामाईड 39.35 एससी 3 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे हळद पिकातील पानावरील ठिपके या रोगाच्या व्यवस्थापनासाठी ॲझोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4 एस सी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून  स्टिकरसह पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकातील कंद सड याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील 4% + मॅनकोझेब 64% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. मागील आठवडयात झालेला पाऊस व वारा यामूळे 30 दिवसाचे ज्वारीचे पिक आडवे पडले असल्यास 15 दिवसात उभे राहते. पिक उभे राहिल्यानंतर एकरी 35 किलो युरियाची मात्रा देवून कोळपणीद्वारे ज्वारीच्या ताटाला माती लावून घ्यावी. सद्यस्थितीत रब्बी ज्वारी पिकाची पेरणी करता येते परंतू पेरणीपूर्वी थायमिथॉक्झाम 30 एफएस 10 मिली  किंवा इमिडाक्लोप्रीड 48 एफएस 12 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करून पेरणी करावी. ज्वारी पिकावरील खोडमाशी, खोडकिडी व लष्करी अळी या किडींच्या व्यवस्थापनासाठी नोमुरीया रिलाई 40 ग्रॅम प्रति 10 लिटर  किंवा थायमिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. बागायती गहू उशीरा पेरणी 15 डिसेंबर पर्यंत करता येते. उशीरा पेरणीसाठी व कमी पाण्यावर येणाऱ्या फुलेनेत्रावती व फुलेसात्वीक या वाणांची निवड करावी.

 

 

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

वादळी वारा, पाऊस झालेल्या संत्रा/मोसंबी बागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी व त्या जागी बोर्डोपेस्ट लावावी. सद्यस्थितीत संत्रा, मोसंबी, लिंबू या फळपिकामध्ये फळधारणा झालेली असल्यास एन.ए.ए 4 मिली + 13:00:45 या खताची 150-200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वादळी वारा, पाऊस झालेल्या आंबा बागेत मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी व त्या जागी बोर्डोपेस्ट लावावी. आंबा पिकामध्ये भूरी रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गंधक सल्फर 80% 40  ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल 5 एससी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

भाजीपाला

काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वारा, पाऊस झालेल्या ठिकाणी प्रादूर्भाव ग्रस्त भाजीपाला गोळा करून नष्ट करावा. मागील आठवडयात झालेला पाऊस व ढगाळ वातावरणामूळे भाजीपाला पिकात (टोमॅटो, मिरची, वांगी) करपा या रोगांचा प्रादूर्भाव होऊ शकतो या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब 75% किंवा क्लोरोथॅलोनील 75% 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.

फुलशेती

काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.

 पशुधन व्यवस्थापन

पशुधनासाठी चारा म्हणून ज्वारी व मका पिक घ्यावे. मागील आठवडयात झालेल्या पावसामूळे सोयाबीनचा भुसा भिजला असल्यास तो सुकवून 2% मिठाची प्रक्रिया करून जनावरांना द्यावा.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक71/ 2023 - 2024      मंगळवार, दिनांक – 05.12.2023

 

 

No comments:

Post a Comment

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 04 एप्रिल रोजी बीड, धाराशिव, नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी जिल्हयात तर दिनांक 05 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 06 ते 08 एप्रिल दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील चोवीस तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 4 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चोविस तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

    हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या...