
हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र,
मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात,
दिनांक 19 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी
नगर व जालना जिल्हयात, दिनांक 20 जून
रोजी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात, तूरळक ठिकाणी वादळी
वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात
दिनांक 17 ते 21 जून रोजी तूरळक ठिकाणी
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील तीन ते चार
दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 20 ते 26
जून 2025 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या
बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात
बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे.
मराठवाडयात ज्या तालूक्यात पेरणी
योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला आहे (छ. संभाजीनगर जिल्हा : पैठण, वैजापूर, कन्नड, सोयगाव;
जालना जिल्हा : बदनापूर;
बीड जिल्हा : वडवणी तालुका; लातूर जिल्हा: चाकूर ;
धाराशिव जिल्हा: तूळजापूर,
उमरगा, लोहारा ; नांदेड जिल्हा: बिलोली,कंधार, लोहा, देगलूर, किनवट) या जिल्हयातील
तालूक्यात वापसा असतांना पेरणी करण्यास हरकत नाही. इतर तालूक्यायत शेतकरी
बांधवांनी पेरणीची घाई करू नये पेरणीयोग्य पाऊस (75-100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी
करावी.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास
पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. कोरडवाहू बिटी कापसाची लागवड 120 X 45 सें.मी. अंतरावर करता येते. लागवडीसाठी 2.5 ते 3.0 कि. ग्रॅ. प्रति
हेक्टरी बियाणे वापरावे. कापूस पिकाची लागवड 15 जूलै पर्यंत करता येते. कापूस
बियाण्यास सुडोमोनास फ्ल्युरोसन्स 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेंडेझीम 3 ग्रॅम प्रति किलो
बियाणे याप्रमाणात बिज प्रक्रिया करावी. यामूळे मर व करपा यासारख्या रोगांचा
प्रादूर्भाव कमी होतो. नत्र स्थिरीकरणासाठी ॲझॅटोबॅक्टर व स्फुरद विद्राव्य करणारे
जिवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. पूर्वमशागतीची
कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. पावसाळ्यात तूर पिकावरील
फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी, शेताच्या चारी बाजूस तीन फूट खोल आणि दोन फूट रुंद चर
काढावी जेणे करून अतिवृष्टी मध्ये शेतातील मातीची धूप होणार नाही व पिकाचे मुळे सडणार
नाहीत. तसेच पुढे चरातील पाणी पाऊस ओसरल्यावर शेतातील पिकास परत कामी येईल. कोरडवाहू तूरीची लागवड 90 X 20 ते 30 सें.मी. अंतरावर करता येते. बागायती तूरीची लागवड 90 X 90 सें.मी. टोकन पध्दतीने करता येते. कोरडवाहूसाठी हेक्टरी 12 ते 15
कि.ग्रॅ. बियाणे तर बागायती टोकन पध्दतीने लागवडीसाठी 5 ते 6 कि.ग्रॅ. प्रति
हेक्टरी बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी तूर बियाण्यास कॅप्टान 80 टक्के किंवा थायरम
75 टक्के 20 ग्रॅम किंवा कार्बेंन्डॅझिम 15 ग्रॅम प्रति 10 किलो बियाणे याप्रमाणात
बिजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम आणि स्फुरद विरघळविणारे
जिवाणू प्रत्येकी 250 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 40 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यावर
बिजप्रक्रिया करावी. पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून
घ्यावीत. मूग व उडीद पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी.
अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 12 ते 15 कि.ग्रॅ. बियाणे वापरावे. मूग/उडीद
पिकाची पेरणी जूलैच्या पहिल्या आठवडयापर्यंत करता येते. मूग/उडीद पेरणीपूर्वी
बियाण्यास 1 ग्रॅम कार्बेंन्डॅझिम किंवा 2 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. तसेच
ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. जिवाणू संवर्धक
रायझोबियम व पीएसबी 250 ग्रॅम प्रत्येकी प्रति 10 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया
करावी. पूर्वमशागतीची कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून
घ्यावीत. भुईमूग पिकाची पेरणी 30 X 10 सें.मी.
(उपट्या) तर 45 X 15 सें.मी.
(पसऱ्या) अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 100 ते 200 कि.ग्रॅ. उपटया तर 80
कि.ग्रॅ. पसऱ्या जातीचे बियाणे वापरावे. भुईमूग पिकाची पेरणी 7 जूलै पर्यंत करता
येते. भुईमूग पिकाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 75 टक्के किंवा कार्बोक्झीम 37.5 टक्के + थायरम 37.5
टक्के 3 ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझीम 12 टक्के + मॅन्कोझेब 63 टक्के 2.5 ग्रॅम प्रति
किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. पूर्वमशागतीची
कामे राहिली असल्यास पूर्वमशागतीची कामे करून घ्यावीत. मका पिकाची पेरणी 60 X 30 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे
वापरावे. मका पिकाची पेरणी जूलै अखेर पर्यंत करता येते. मका पिकास पेरणीपूर्वी
सायॲन्ट्रानिलीप्रोल 19.8% + थायामिथॉक्झाम
19.8% एफएस 6 मिली
प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी या बिजप्रक्रियेमूळे पेरणीनंतर 15 ते 20
दिवसापर्यंत पिकाचे अमेरिकन लष्करी अळीपासून संरक्षण होते. बियाण्यास थायरम 2 ते
2.5 ग्रॅम तसेच ॲझोटोबॅक्टर हे जिवाणू संवर्धक 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास
बिजप्रक्रिया करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
नवीन केळी बागेची लागवड करून घ्यावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. लागवडीच्या वेळेस शेणखत तर लागवडीनंतर 30
दिवसाने रासायनिक खत व्यवस्थापन करावे. नवीन आंबा लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे
केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. द्राक्ष बागेतील रोगग्रस्त पाने काढून टाकावीत
व रोगनाशकाची फवारणी करावी. द्राक्ष बागेतील अतिरिक्त बगल फुटी काढून घ्याव्यात
जेणेकरून जास्तीत जास्त सूर्यप्रकाश डोळ्यावर पडलयास डोळा फुटण्यास मदत होते.
द्राक्ष बागेतील वेलीची बांधणी करावी. नवीन सिताफळ लागवडीसाठी पूर्व तयारीची कामे
केली नसल्यास लवकरात लवकर ती पूर्ण करून घ्यावीत. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत
रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी.
भाजीपाला
पाण्याची उपलब्धता असल्यास भाजीपाला (वांगी, मिरची, टोमॅटो
इत्यादी) पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. भाजीपाल्याचे बी
टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार झाऱ्याच्या
साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी.
फुलशेती
पाण्याची
उपलब्धता असल्यास फुल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे.
फुलपिकाचे बी टाकलेल्या गादी वाफ्यावरील तणांचे नियंत्रण करावे आवश्यकतेनूसार
झाऱ्याच्या साहाय्याने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून
घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
अचानक वातावरणात झालेल्या बदलामूळे वातावरण ओलसर व दमट झाले असून
जनावरात रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते त्यामूळे जनावरांचे आरोग्य
उत्तम व निरोगबी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात : 1. जनावरे निवा-याच्या ठिकाणी
बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी 2. पशूधनास खुले पाणी, तलाव
किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर
ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये.तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी
झाडाच्या आडोशाला थांबू नये. 3. पावसाळ्यात गोठयत पाणी साचनार नाही व गोठा ओलसर
राहणार नाही याची काळजी घ्यावी.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला
पत्रक क्रमांक – 23/2025- 2026 मंगळवार, दिनांक – 17.06.2025
No comments:
Post a Comment