Monday, 2 February 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 फेब्रुवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस ते अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात वाढ होऊन त्यानंतर पुढील तीन दिवसात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 फेब्रुवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस ते अठ्ठेचाळीस तासात किमान तापमानात वाढ होऊन त्यानंतर पुढील तीन दिवसात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 06 ते 12 फेब्रूवारी 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करून घ्यावी व वाळल्यानंतरच मळणी करावी. काढणी केलेल्या तूर पिकची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. रब्बी ज्वारी पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

रब्बी सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना पाणी द्यावे.

गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.

उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरणीसाठी एस.बी.11, टीएजी 24, एलजीएन-1, टीएलजी-45, टीजी 26, जेएल 24, जेएल 220 या वाणांपैकी वाणाची निवड करावी. पेरणीपूर्वी  बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबीयम व पीएसबी प्रति 10 किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत घडवाढीसाठी 00:00:50 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या केळी घडांची काढणी करून घ्यावी.

आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत मोहोरावर भूरी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी सल्फर 80 % डब्ल्यूपी 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. द्राक्ष बागेत भूरी रोगाच्या व्यवस्थापनासाठी हेक्झाकोनॅझोल 5 % एससी 1 मिली किंवा मायक्लोब्यूटॅनिल 10 % डब्ल्यूपी 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा  डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

थंडीच्या दिवसात जेव्हा थंड वारे वाहू लागतात त्या वेळेस आपल्या जनावरांचे विशेषत: शेळी आणि मेंढी यांचे थंडीपासून संरक्षण करावे. त्याकरीता त्यांच्या निवाऱ्याच्या जागेत ऊब असावी, माफक प्रमाणात हवा खेळती असावी. नाकातून पाणी येणे, भूक मंदावणे, चालण्याकरीता कष्ट होणे ई. लक्षणे दिसू लागताच पशुवैद्यकाशी त्वरीत संपर्क साधावा. सर्वसाधारणपणे बकरीच्या पिल्लांना थंडीची बाधा लवकर होते. थंडीच्या दिवसात करडांची मरतुक टाळण्यासाठी त्यांना ऊबदार जागेत ठेवावे. मोठ्या टोपलीत कापड टाकून त्यामध्ये पिल्लांना ठेवता येऊ शकते, थंडीपासून संरक्षण होते. गोठ्यात माफक हवा असावी. शेळीचे दुध भरपूर प्रमाणात द्यावे ज्यामूळे पिल्लांच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन थंडीपासून बाधा होणार नाही.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक89/2025-2026    मंगळवार, दिनांक – 03.02.2026