हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून
हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चोविस तासात किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होऊन त्यानंतर पुढील तीन दिवसात 1 ते 2 अं.से. ने वाढ
होण्याची तर कमाल तापमानात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार
नाही.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 13 ते 19 फेब्रूवारी 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल
तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
संदेश : मराठवाडयात
पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस,
भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण
कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि
सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90
ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे
पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात. रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5
टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी
4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी
करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
रब्बी सूर्यफूल दाणे भरण्याच्या अवस्थमध्ये असतांना पाणी द्यावे.
गहू पिकास दाण्यात दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना
(पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी
द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग
गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद
करावीत.
वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे.
फळबागेचे व्यवस्थापन
केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत तण
व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी.
आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत मोहोरावर
भूरी रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी सल्फर 80 % डब्ल्यूपी 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. द्राक्ष बागेत भूरी रोगाच्या
व्यवस्थापनासाठी हेक्झाकोनॅझोल 5 %
एससी 1 मिली किंवा मायक्लोब्यूटॅनिल 10 % डब्ल्यूपी
10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष
घडांची काढणी करून घ्यावी.
सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार
पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. भाजीपाला
(मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत
असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने
पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी.
पशुधन व्यवस्थापन
सध्या कमाल तापमानात वाढ होत असल्यामूळे, आपल्या जनावरांपासून
अधिक दुध उत्पादन घ्यावयाचे असेल व प्रजनन क्षम ठेवायचे असेल तर वेळीच बदलत्या वातावरणाचा
अभ्यास करुन जनावरांच्या गोठ्या मध्ये बदल करून आरामदायी वातावरण पुरवण्याचा प्रयत्न
करा व पशुवैद्यकाच्या सल्ल्याने संतुलित आहार द्या आणि होणाऱ्या उष्णतेच्या ताणापासून
आपल्या पशुधनांचे संरक्षण करा.
सौजन्य
मुख्य प्रकल्प
समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 91/2025-2026 मंगळवार,
दिनांक –
10.02.2026
No comments:
Post a Comment