Sunday, 1 March 2026

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 


हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 06 ते 12 मार्च 2026 दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

संदेश : मराठवाडयात पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

कापणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची कापणी करून घ्यावी.

उशीरा पेरणी केलेल्या गहू पिकास दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी  झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी करून घ्यावी.

उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.

मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. उशीरा पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के  4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत ‍तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी.

आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए 15 पीपीएम ची फवारणी करावी.

द्राक्ष बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.

सिताफळ बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

नविन लागवड व पूर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. टोमॅटो पिकावर नागअळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी ब्रॉफ्लॅनिलाईड 20 % एससी 25 मिली किंवा सायन्ट्रानिलिप्रोल 10.26 % ओडी 360 मिली किंवा स्पायनेटोरम 11.70 % एससी 180 मिली प्रति एकर याप्रमाणे वरीलपैकी एका किटकनाशकाची 150-200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी. उन्हाळी हंगामासाठी (टोमॅटो, वांगे, मिरची) भाजीपाला पिकाची रोपे तयार असल्यास पूर्नलागवड करावी.

फुलशेती

फुल पिकात खूरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुल पिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकाची लागवड करून घ्यावी.

पशुधन व्यवस्थापन

कमाल तापमानात होत असलेल्या वाढीमूळे, जनावरांना सावलीत बांधावे आणि पिण्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याचा पूरवठा करावा. उष्णतेपासून पशूधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे व गोठयातील तापमाना कमी करण्यासाठी गोठ्याच्या छतास असणारे पत्रे ओले करण्यासाठी ठिबक सिंचन पाईपचा वापर करावा. पशुधनास मूबलक प्रमाणात हिरवा चारा, प्रथिनेयूक्त, खनिजमिश्रण आणि मिठयूक्त खाद्य द्यावे. पशुधनास सकाळी किंवा सायंकाळी चारावयास सोडावे.

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक97/2025-2026    सोमवार, दिनांक 02.03.2026

 

No comments:

Post a Comment