हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 31 मे रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड
जिल्हयात तर दिनांक 01 जून रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व
नांदेड जिल्हयात तर दिनांक 02 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक
ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील पाच
दिवसात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील 24 ते 48 तासात कमाल व किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही
व त्यानंतर हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 29 मे ते 04
जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची व दिनांक 05 ते 11
जून 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सररासरीपेक्षा कमी व किमान
तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
संदेश : फळबागेस,
भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकाच्या
पेरणीसाठी दोन ते तिन वर्षात एकदा खोल (30 ते 45 सें.मी.) नांगरणी करावी.
नांगरणीनंतर दोन ते तिन वखराच्या पाळया देऊन जमिन समपातळीत करावी. सोयाबीन
पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन
पेरणीसाठी अति लवकर येणारे वाण: परभणी सोना (एमएयुएस-47), लवकर येणारे वाण:
एमएयूएस-71 (समृध्दी), एमएयुएस-158, एमएयुएस-612, जवाहर (जेएस-335), शक्ती
(एमएयुएस-81), मध्यम उशिरा येणारे वाण: प्रसाद (एमएयुएस-1), प्रतिकार
(एमएयूएस-61), एमएयुएस-162, प्रतिष्ठा (एमएयूएस 61-2) इत्यादी वाणांचा वापर करावा.
सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी.
उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरणीसाठी वापरावे.
खरीप ज्वारी पेरणीसाठी एकदा नांगरणी करून 2 ते 3 वखराच्या पाळया देऊन
जमिनीची मशागत करावी. खरीप ज्वारी पेरणीसाठी संकरीत वाण: सीएसएच-14, सीएसएच-16,
सीएसएच-25 (परभणी साईनाथ), सुधारीत वाण: परभणी शक्ती, पीव्हीके-809, पीव्हीके-801
(परभणी श्वेता) इत्यादी वाणांचा वापर करावा.
बाजरीच्या पेरणीसाठी जमिनीची नांगरट करावी व वखराच्या 2 पाळया
द्याव्यात. बाजरीच्या पेरणीसाठी संकरीत वाण: सबुरी, श्रध्दा, शांती, एएचबी-1269,
एएचबी-1200 (एफई) सुधारीत वाण: आयसीटीपी, समृध्दी, परभणी संपदा या वाणांचा वापर
करावा.
अडसाली ऊस लागवडीसाठी जमिनीची उन्हाळयात खोल नांगरट करून जमिन
तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कूळवाच्या उभ्या-आडव्या पाळयानंतर सपाटीकरण करावे. ऊस
पिकात आंतरमशागतीची कामे करून तणांचे नियंत्रण करावे.
हळद लागवडीसाठी जमिनीची 18 ते 22 सें.मी. पर्यंत खोल नांगरट करून
घ्यावी. नांगरटीनंतर शेतातील तणांचे अवशेष वेचून जाळून नष्ट करावेत. नांगरीनंतर
कुळवणी करावी. त्यानंतर ढेकळे फोडून घ्यावीत.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी मृग बहार नियोजनासाठी शेतकऱ्यांनी बागेत नांगरणी
करावी व शेणखत टाकण्यासाठी जमिन तयार करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या
संत्रा/मोसंबी बागेला पाण्याचा ताण बसणार
नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड केलेल्या बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी
लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना
उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच
बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. संत्रा नविन बाग लागवडीसाठी नागपूर संत्रा,
किन्नो तर मोसंबी नविन बाग लागवडीसाठी न्यूसेलर, सातगुडी व फुले मोसंबी इत्यादी
जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी
करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड
केलेल्या व लहान संत्रा/मोसंबी झाडांना काठीने आधार द्यावा.
डाळींब मृग बहार नियोजनासाठी शेतकऱ्यांनी बागेत नांगरणी करावी व
शेणखत टाकण्यासाठी जमिन तयार करून घ्यावी. नविन लागवड केलेल्या डाळींब बागेला
पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी
घ्यावी. नविन लागवड केलेल्या बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा
सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून
संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ
आच्छादन करावे. डाळींब नविन बाग लागवडीसाठी भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले
आरक्ता, इत्यादी जातींची निवड करावी. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच
रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन
लागवड केलेल्या व लहान डाळींब झाडांना काठीने आधार द्यावा.
नविन लागवड केलेल्या चिकू बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. नविन लागवड
केलेल्या बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन
करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी
तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. चिकू
नविन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल इत्यादी जातींची निवड करावी.
लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी. तूरळक ठिकाणी
वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज लक्षात घेता, नविन लागवड केलेल्या व लहान चिकू झाडांना
काठीने आधार द्यावा.
भाजीपाला
टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी जमिन खोलवर नांगरून कुळवणी करावी.
कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावेत. काढणीस तयार आसलेल्या
भाजीपाला पिकांची काढणी करावी. भाजीपाला पिकात पाण्याचा ताण बसणार नाही याची
दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा सायंकाळी सुक्ष्म सिंचन
पध्दतीने पाणी द्यावे. खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी
गादी वाफे तयार करून घ्यावेत. मिरची पिकाच्या लागवडीसाठी परभणी तेजस, पूसा ज्वाला,
अग्नीरेखा, फुले ज्योती, जी-4, जी-3 इत्यादी जातींची निवड करावी. टोमॅटो पिकाच्या
लागवडीसाठी देवगिरी, परभणी यशश्री, ए.टी.एच-1, पुसारूबी, धनश्री, भाग्यश्री,
आर्कारक्षक इत्यादी जातींची निवड करावी.
फुलशेती
खरीप हंगामात फुलपिकांच्या लागवडीसाठी फुलपिकानूसार जमिनीची पूर्व
मशागत करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकास
पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. फुल पिकास आवश्यकतेनुसार सकाळी किंवा
सायंकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. खरीप हंगामात फुलपिकांच्या
लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. गुलाब पिकाच्या
लागवडीसाठी ग्लॅडीयटर, सुपर स्टार, डबल डिलाईट, रेड मास्टर पीस इत्यादी जातींची
निवड करावी.
पशुधन व्यवस्थापन
तापमानात वाढ झाल्यामूळे दूधाळ जनावरांमध्ये दुध उत्पादन कमी होते
व त्याचबरोबर दुधातील स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण कमी होते. हया पासून दुधाळ जनावरांचे संरक्षण करण्यासाठी
त्यांच्या गोठ्याच्या शेड वरील छताला स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स ने थंडावा निर्माण
करावा, दुपारी जनावरांना धुवून काढावे, जमलेच तर पंखा किंवा कुलर्सची व्यवस्था शेड मध्ये करावी, शेडच्या बाजूला पोत्याचे पडदे बांधून त्यांना भिजवावे. गोठ्याची उंची कमीत कमी मध्यभागी 15 फुट उंच असावी. पशुधनास पिण्यास भरपूर पाणी द्यावे. तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या
पावसाची शक्यता असल्यामूळे चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ
नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व
पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशुधनास खुले पाणी तलाव किंवा नदीपासून
दुर ठेवावे, ट्रॅकटर आणि इतर धातुंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास
झाडाखाली जमा होऊ देऊ नये, तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोश्याला
थांबू नये.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 17/2026-2027 शुक्रवार,
दिनांक –
29.05.2026
No comments:
Post a Comment