हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 26 जूलै रोजी छत्रपती
संभाजी नगर, बीड व जालना जिल्हयात तर दिनांक 28 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर व
जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आहे. दिनांक 24 जूलै रोजी छत्रपती संभाजी
नगर, जालना, बीड जिल्हयात तर दिनांक 25 जूलै रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात
तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक
24 व 25 जूलै रोजी काही ठिकाणी तर दिनांक 26 ते 28 जूलै दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्यात स्वरूपाच्या पावसाची शक्यता
आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने
वाढ होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 24 ते 30 जूलै 2026 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान
व किमान तापमान सरासरीएवढे तर दिनांक 31 जूलै ते 06 ऑगस्ट दरम्यान पाऊस
सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त व किमान
तापमान सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडयातील छत्रपती संभाजी नगर जिल्हयातील छत्रपती संभाजी नगर तालूक्यातील (छत्रपती
संभाजी नगर), पैठण तालूक्यातील (लोहगाव) : बीड
जिल्हयातील अंबेजोगाई तालूक्यातील (लोखंडी), केज तालूक्यातील (यूसूफ) : हिंगोली
जिल्हयातील कळमनूरी तालूक्यातील (आखाडा) वसमत तालूक्यातील (वसमत, हयातनगर, गिरगाव,
हट्टा), सेनगाव तालूक्यातील (सेनगाव, आजेगाव, साखरा, हट्टा) : परभणी जिल्हयातील जिंतूर तालूक्यातील (सांगवी) इत्यादी
महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही तर इतर महसूल मंडळातील
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.
संदेश : पेरणी न
झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाल्या नंतर सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर
(4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ ही पिके घ्यावीत.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. सोयाबीन
पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी
प्रोफेनोफॉस 50% 400 मिली किंवा इथिऑन 50%
600मिली किंवा थायामिथॉक्झाम 12.6% + लॅम्बडा
सायहॅलोथ्रीन 9.5% (पूर्वमिश्रित किटकनाशक) 50 मिली किंवा
प्रादूर्भाव खूप जास्त असल्यास क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% 60 मिली प्रति एकर यापैकी कुठलेही एक किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी
करावी. सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमूळे सोयाबीन पिक पिवळे दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी ईडीटीए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड-2 50
ग्रॅम किंवा 50 मिली + 19:19:19 खत 100
ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. सोयाबीन
पिकात पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोझॅक प्रादूर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
खरीप ज्वारी पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. खरीप
ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी
इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम
किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची
आलटून पालटून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक
पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
बाजरी पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचे नियंत्रण
होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.
सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे ऊस पिकात पायरीला (पाकोळी) या किडीचा
प्रादूर्भाव दिसून येत आहे, किडीच्या निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून
नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या
अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या
व्यवस्थापनासाठी मेटाराझीयम ॲनोसोप्ली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी
तसेच रासायनिक व्यवस्थापनकरिता क्लोरोपायरीफॉस 20 टक्के 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस
36 टक्के 200 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघुन फवारावे.
हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात
मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय
किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष
दिले आहेत). हळद पिकात जमिनीत वापसा असतांना अंतरमशागतीची कामे करून पिक तण विरहीत
ठेवावे.
फळबागेचे व्यवस्थापन
मृग बहार संत्रा/मोसंबी बागेत फुलधारणा
व फळधारणा अवस्थेत असल्यामूळे, कोणत्याही किटकनाशकाची फवारणी करू नये.
संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
मृग बहार डाळींब बागेत रोगाचा
प्रादूर्भाव होण्याची शक्यता पाहता 1
% बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत
अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण
नियंत्रण करावे.
भाजीपाला
पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून बियाद्वारे लागवड केल्या
जाणाऱ्या भाज्या उदा. भेंडी, कारले, भोपळा, दोडका ईत्यादी भाजीपाला पिकांची लागवड
करावी. गादीवाफ्यावर तयार केलेल्या भाजीपाला पिकांच्या रोपांना 45 दिवस झाले
असल्यास पाऊस झालेल्या ठिकाणी जमिनीत ओलावा बघून भाजीपाला पिकांची (वांगी, मिरची,
टोमॅटो इ.) पूर्नलागवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून
घ्यावी. भाजीपाला पिकात तण नियंत्रण करावे.
फुलशेती
पाउस झालेल्या ठिकाणी
जमिनीत ओलावा असल्याची खात्री करून फुल पिकाची पूर्नलागवड करावी. काढणीस
तयार असलेल्या फुलपिकाची काढणी करून घ्यावी. फुल पिकात तण नियंत्रण करावे.
पशुधन व्यवस्थापन
पावसाळ्यात जनावरांभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढतो त्यासाठी
पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. जनावरांना पावसाळ्यात
उदभवणाऱ्या आजारांचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.विशेष शेळी व
मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या
रोगांची लसीकरण योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोवळा, हिरवा चारा पशुधनास
जास्त प्रमाणात आहारात देणे टाळावे.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 33/2026-2027 शुक्रवार,
दिनांक –
24.07.2026
No comments:
Post a Comment