हवामान सारांश / चेतावनी :
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार
दिनांक 25 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 26
सप्टेंबर रोजी जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी जोराचे वारे
(40 ते 50 प्रति तास) राहून विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दिनांक
25 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव जिल्हया तर दिनांक 26
सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी जोराचे वारे (40 ते 50
प्रति तास) राहण्याची शक्यता आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्हया तर
दिनांक 28 व 29 सप्टेंबर रोजी धाराशिव व बीड जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या
कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिनांक 27 सप्टेंबर रोजी बीड व
लातूर जिल्हयात तर दिनांक 28 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर व लातूर जिल्हयात
तर दिनांक 29 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, नांदेड व धाराशिव
जिल्हयात तूरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात
पुढील एक ते दोन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर हळूहळू
2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील तीन
दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व त्यानंतर किंचित वाढ
होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस)
मराठवाडयात दिनांक 25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल
तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व दिनांक 02 ते
08 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे ते
सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता
आहे.
संदेश : पिकास,
बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
सोयाबीन पिकात पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट,शेंगा
करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या
व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10%+ सल्फर 65 % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) 500 ग्रॅम
किंवा टेब्युकोनॅझोल 25.9 % 250 मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20 % 150 ते 200 ग्रॅम
किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3 %+ इपिक्साकोनाझोल 5 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक)
300 मिली प्रति एकर पावसाची उघाड बघून फवारावे. काढणीस तयार असलेल्या सोयाबीन
पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
खरीप ज्वारी पिकास आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. खरीप ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास
याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली
प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघाड बघुन
फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
बाजरी पिकास आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे.
ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन
करावे. ऊस पिकात पांढरी माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या
व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 17.8%
60 मिली किंवा ॲसिफेट 75% 400 ग्रॅम प्रति एकर
याप्रमाणे पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. आवश्यकता असल्यास दहा दिवसानंतर दुसरी
फवारणी करावी मात्र मित्र किडींची संख्या जास्त असल्यास अनावश्यक दुसरी फवारणी
टाळावी एकाच प्रकारच्या किटकनाशकाची वारंवार फवारणी न करता वेगवेगळया
कार्यपध्दतीच्या किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.
हळद पिकास आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. हळद पिकास 25 किलो नत्रासोबत 00:52:34 15.5 किलो प्रति एकरी
सूक्ष्म सिंचन पध्दतीने तीन ते चार वेळा विभागून द्यावे. हळद पिकात करपा रोगाचा
प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, रोगग्रस्त पाने वेळोवेळी गोळा करून शेताबाहेर नष्ट
करावीत व शेत स्वच्छ ठेवावे. याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझीम 50% 400 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 75
% 500 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 50
% 500 ग्रॅम फवारणी करताना चांगल्या प्रतीचे चिकटवणारे
द्रव्य मिसळावे. प्रादुर्भाव जास्त असल्यास ॲझॉक्सीस्ट्रोबिन 18.2 % + डायफेनोकोनॅझोल 11.4 % 200 मिली
किंवा प्रोपिकोनॅझोल 25 % प्रवाही 200 मिली
किंवा क्लोरोथॅलोनील 75% 500 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे
स्टिकर सह फवारणी करावी. हळद पिकात कंदकूज रोगाच्या व्यवस्थापनासाठी,
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेणखतात
मिसळून जमिनीत द्यावे. कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास खालीलपैकी कोणत्याही
एका बुरशीनाशकाची जमिनीतून आळवणी करावी. कार्बेन्डाझीम 50 %
1 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 75% 3 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड
50 % 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी. (आळवणी
करताना जमिनीत योग्य वापसा असावा. आळवणी केल्यानंतर 2 ते 3 दिवस पाणी देऊ नये).
हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15
दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट
30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी
करावी व क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी या
प्रमाणात जमिनीतून आळवणी करावी व प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिन्यातून एकदा अळवणी
करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ
शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल्या कंदावर कंदमाशीची मादी अंडी
घालते. त्यामुळे उघडे पडलेले कंद वेळोवेळी मातीने झाकावेत व वेळेवर भरणी करावी.
हरभऱ्याच्या पेरणीसाठी मध्यम ते भारी,
पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. चोपन व आम्ल जमिनीत हे पीक बरोबर येत
नाही. पाणी साठवून ठेवणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास हे पीक उमळते. या पिकास कोरडे व
थंड हवामान मानवते.
करडई पिकाला मध्यम ते भारी, उत्तम निचरा
आणि ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. खरीपातील मुग, उडीद किंवा सोयाबीन
काढणीनंतर करडई पीक घ्यावे.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड 2 ग्रॅम प्रति
100 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ढगाळ वातावरण व
पावसामूळे बागेत रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून किटकनाशकची व रोगनाशकाची
पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
डाळींब बागेस आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. मृग बहार डाळींब बागेत तेल्या रोगाचा प्रादूर्भाव होण्याची
शक्यता पाहता 1 % बोर्डो मिश्रणाची व याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन 2 ग्रॅम
किंवा कॉपर ऑक्झी क्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड
बघून फवारणी करावी. डाळींब बागेत किटकनाशकाची किंवा रोगनाशकाची पावसाची उघाड बघून
फवारणी करावी.
चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
भाजीपाला
भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला
पिकास जमिनीत ओलावा बघून खतामात्रा देण्यात यावी. भाजीपाला पिकात जमिनीत वापसा
असतांना अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला (मिरची, वांगे व
भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा
प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर
पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलशेती
फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी
व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करावी व
प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी. फुल पिकात अंतरमशागतीची कामे करून पिक तण
विरहीत ठेवावे.
चारा पिके
चाऱ्यासाठी लागवड केलेल्या संकरीत
नेपियर पिकाची पहिली कापणी 65 ते 70
दिवसानी तर नंतरच्या कापण्या 40 ते 45 दिवसानी (7 ते 8 कापण्या) कराव्यात.
पशुधन व्यवस्थापन
कुक्कुट पालन एकदम हवेशीर, शेडची गळती
एकदम कोरडे गारी/लिटर आणि पावसाच्या पाण्याचा शेडच्या परिसरातील योग्य निचरा होईल
याची काळजी घ्यावी तसेच पिण्यास स्वच्छ पाण्याची अहोरात्र व्यवस्था होईल याची
काळजी घ्यावी. शेळ्यांच्या शेडमधील बेडींग/झोपण्यासाठी पसरलेला पेंडा स्वच्छ व
कोरडा राहील याची दक्षता घ्यावी. ह्या काळात नियमीत निर्जंतूकीकरण व परोपजिवी
प्रतिबंधक उपाय करावेत.
सौजन्य
मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक – 51/2026-2027 शुक्रवार,
दिनांक –
25.09.2026
No comments:
Post a Comment