Friday 24 March 2023

दिनांक 25 मार्च रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 25 मार्च  रोजी धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू 3 ते 5 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 24 ते 30 मार्च 2023 दरम्यान व दिनांक 31 मार्च ते 06 एप्रिल 2023 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित कमी झालेला आहे तर इतर जमिनीतील ओलावा किंचित वाढलेला आहे. 

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 29 मार्च ते 04 एप्रिल 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

काढणी व मळणी केलेल्या करडई, गहू व रब्बी ज्वारी पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणीस तयार असलेल्या व काढणी न केलेल्या हळद पिकाची काढणी पावसाची उघाड बघून करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत.  हळदीची उघडयावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा/मोसंबी, आंबा व डाळींब फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. संत्रा/मोसंबी, आंबा व डाळींब बागेस आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

चारा पिके

काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

भाजीपाला

काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी भाजीपाला पिकात आच्छादन करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे.

पशुधन व्यवस्थापन

आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे. अति उष्ण काळामध्ये जनावरांच्या पाठीवर पोते टाकून ते पाण्याने  भिजवून ठेवावे.

दि. 25 मार्च रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्‍याच्‍या  वेळी झाडाच्‍या आडोशाला थांबु नये.

तुती रेशीम उद्योग

रेशीम कीटक संगोपनगृहात तापमान व आर्द्रता उन्हाळ्यात लोखंडी पत्र्याऐवजी सिमेंट पत्रांच्या वर गवत/कडबा या सारखे आच्छादन टाकून वरती स्प्रींकलरची व्यवस्था करून पाणी खेळते ठेवता येते. बाजूला शेडनेटच्या बाहेरच्या बाजूस गोणपाट/चवाळ्याच्या साहाय्याने चोहिबाजूने आच्छादन करून त्यास दोरीच्या साहाय्याने आवश्यक तेव्हा खाली वर करायची व्यवस्था ठेवता येते व त्यावर ठिबक सिंचन 16 किंवा 20  मीमी प्लास्टीक ट्यूब मध्ये 0.5 एच.पी. मोटारच्या साहाय्याने पाणी सोडण्याची व्यवस्था केली तरा संगोपन गृहात आर्द्रता 80 ते 85 टक्के व तापमान 25 ते 28 सें.ग्रे. ठेवणे शक्य होते व उन्हाळ्यात कोषाची 3 पीके काढता येतील. मराठवाडा विभागात उन्हाळ्यात चांगला सूर्य प्रकाश मिळत असल्याने पानाचे उत्पादन ठिबक सिंचन व्यवस्था असेल तर चांगले मिळते.

 

 

सौजन्‍य

डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक103/2022 - 2023     शुक्रवार, दिनांक – 24.03.2023

 

No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...