Thursday 8 February 2024

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 10 फेब्रूवारी रोजी जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात दिनांक 10 फेब्रूवारी रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या तर दिनांक 11 फेब्रूवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. पुढील चार दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होऊन त्यानंतर किमान तापमानात 1 ते 2 अं.से. ने घट होण्याची शक्यता आहे. दिनांक 10 फेब्रूवारी रोजी जालना, परभणी, हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 09 ते 15 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व दिनांक 16 ते 22 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 14 ते 20 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

दिनांक 10 फेब्रूवारी रोजी तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर दिनांक 11 फेब्रूवारी रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या हरभरा पिकास मध्यम जमिनीत 40 ते 50 दिवसांनी दूसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा मूळकूजव्या रोगाने पिकाचे नूकसान होते. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी 2 कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी 5% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस 25% इसी 20 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% 4.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, उशीरा पेरणी केलेल्या करडई पिकास 65 ते 70 दिवसांनी पिक फुलोऱ्यात असतांना तूषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30% 13 मिली किंवा असिफेट 75% 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हंगामी/सुरू ऊस पिकाची लागवड लवकरात लवकर करावी. हळद पिकाच्या काढणीपूर्वी पंधरा दिवस आधी  पिकाला पाणी देणे बंद करावे. उन्हाळी तीळ लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोगाच्या बंदोबस्तासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम कार्बेन्डेझीम (बाविस्टीन) किंवा 2.5 ग्रॅम थायरम किंवा 4 ग्रॅम ट्रायकोडर्माची बिज प्रक्रिया करावी. नंतर ॲझॅटोफॉस 20 मिली प्रति किलो बियाणे प्रमाणे चोळावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे मृगबहार धरलेल्या लिंबुवर्गीय पिकांत कोळी किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क 5% किंवा ॲझाडिरेक्टीन (10 हजार पीपीएम) 3 ते 5 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. रासायनिक नियंत्रणासाठी डायकोफॉल 18.5 ईसी 2.7 मिली किंवा डायफेनथीयूरोन (50 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा विद्राव्य गंधक 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आवश्‍यकता असल्यास दुसरी फवारणी 15 दिवसांच्‍या अंतराने करावी. डाळींब बागेत अंबे बहार धरण्यासाठी छाटणी करून घ्यावी व बागेस हलके पाणी देऊन (अंबवणी करणे) शिफारसीत खतमात्रा द्यावी. काढणी न केलेल्या व काढणीस तयार असलेल्या चिकू फळांची काढणी करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, चिकू बागेस आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

भाजीपाला

भाजीपाला पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, भाजीपाला पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. कमाल व किमान तापमानातील तफावतीमूळे वांगे भाजीपाला पिकात शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भाव ग्रस्त शेंडे व फळे गोळा करून नष्ट करावेत व त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतात एकरी 2 कामगंध सापळे लावावेत किंवा क्लोरँट्रानिलीप्रोल 18.5% एससी 4 मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20% एससी 20 मिली किंवा सायपरमेथ्रीन 10% ईसी 11 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची पिकावरील फुल किडींच्या व्यवस्थापनासाठी ॲसिटामेप्रिड 20% एसपी 2 ग्रॅम किंवा सायअँट्रानिलीप्रोल 10.26 ओडी 12 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5% एसजी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलशेती

पुढील आठवड्यात असलेल्या व्हॅलेंटाइन्स  डेमुळे बाजार पेठेत गुलाब फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी टप्प्याटप्प्याने करून बाजार पेठेत पाठवावी.  कमाल तापमानात झालेली वाढ  व पुढील तीन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज लक्षात घेता, फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.

तुती रेशीम उद्योग

रेशीम कीटक संगोपन गृहात 22 ते 28 सें.ग्रे. ठेवावे तर आर्द्रता 80 ते 85 % ठेवावी. हिवाळ्यात 20 सें.ग्रे.च्या खाली किंवा उन्हाळयात 35 सें.ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक तुती पाने खात नाहित व कोष करण्याची क्रिया मंदावते. म्हणून संगोपन गृहात तापमापी इलेक्ट्रॉनिक यंत्र असावे. ज्यात आर्द्रता पण मापण करता येते. हिवाळयात व उन्हाळयात मराठवाडा विभागात आर्द्रता खूपच कमी राहते म्हणून हयुमीडी फायर कम हिटरचा वापर करावा. हिवाळयात कोळशाच्या किंवा इलेक्ट्कि शेगडीच्या साहाय्याने संगोपन गृहातील तापमानात वाढ करता येते. उन्हाळयात छतावर तुषार सिंचनाची व्यवस्था करावी. त्यासाठी 1000 लिटर पाण्याची टाकी व एक एचपी इलेक्ट्रिक मोटारची व्यवस्था करावी. बाजूच्या शेडनेटवर गोणपाट आच्छादन करून लॅटरलच्या साहाय्याने पाणी सोडून संगोपन गृहातील आर्द्रतेत वाढ करता येते.

पशुधन व्यवस्थापन

वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्‍या ठिकाणी बांधावे.  

सामुदायिक विज्ञान

पपई आणि पेरूमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व “अ” आणि “क” असून ही फळे तंतूमय पदार्थ तसेच अँटिऑक्सिडंटसचा उत्कृष्ट स्त्रोत असल्याने त्यांचे सेवन करणे उत्तम स्वास्थ्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

 

सौजन्‍य

मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठपरभणी

 

मराठवाडा कृषि हवामान सल्ला पत्रक क्रमांक90/2023 - 2024      शुक्रवार, दिनांक 09.02.2024

 

 

 


No comments:

Post a Comment

मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश अंशत: ढगाळ राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 17 मे रोजी नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव व हिंगोली जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दिनांक 18 मे रोजी लातूर, नांदेड, परभणी,‍ हिंगोली व बीड जिल्हयात तर दिनांक 19 मे रोजी लातूर, नांदेड, धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी : प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस दूपारच्या वेळी आकाश...